नितीन देशमुख : आपल्याकडे डान्स बार, क्लबमध्ये जाणे एक फॅशन आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचे पेव फुटत आहे. तशीच वृद्धाश्रमाची फॅशन होत असल्याने पुढील काळात वृद्धाश्रमात वाढ होईल. ते थांबवण्यासाठी जनरेशन गॅप भरली पाहिजे. नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असतील आणि घरात काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवणे ठीक आहे. पण फॅशन म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे चूक असल्याचे मत समाजकार्याचा विद्यार्थी (एमएसडब्ल्यू) अजिंक्य गजाकोश याने नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बोलताना व्यक्त केले. त्यात सत्य आहे, यामध्ये शंका नाही.
मातृदिन, पितृदिन साजरा करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून बेगडी प्रेम दाखवणारे काही महाभाग आपल्या आई-वडिलांना घरातील एक अडचण समजतात. त्यांना एक तर वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात, नाही तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गरीब, श्रीमंत किंवा उच्चशिक्षित असा भेदभाव नाही. परदेशात राहणार्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने माहीत नसल्याच्या किंवा अंत्यसंस्कारला उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांना व्हॉट्सअॅपवर दाखवा सांगणार्या आजच्या तरुणांच्या बातम्या आपण वाचत असतो.
श्रीमंत असो वा गरीब आई शेवटी आईच असते. मुलगा कितीही मोठा झाला तरी तिला तो लहानच असतो. आपले कितीही हाल झाले तरी ती मुलाची काळजी करीत असते. नवी मुंबईत राहणार्या एका मध्यमवयीन महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतर लोकांची भांडी घासून मुलाला मोठे केले, पण त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे नोकरी नाही. आईच्या पैशावर जगताना मुलगा आईला काम करून आल्यावर रात्री एक तासही झोपू देत नाही. आई आजारी आहे तरी रात्री घरी आल्यावर तिला मारतो, प्रसंगी नशेत आईजवळ अश्लील वर्तन करण्याचाही प्रयत्न करतो. आई रडत तक्रार करते, पण आपण त्याला सोडून गेलो तर त्याला खायला कोण घालेल म्हणून त्याला सोडून जायला ती तयार नाही. आपल्या मुलाच्या काळजीने त्याच्या सगळ्या चुकाही ती माफ करताना दिसते.
ज्यांनी आपल्याला या जगात आणले, वाढविले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटनाही नगर जिल्ह्यात समोर आली होती. तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे, त्यासाठी सप्तशृंगगडावर जायचे आहे, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगगडावर आणले आणि त्यांना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वतः तेथून पोबारा केला. हा धक्कादायक प्रकार मंदिराच्या सुरक्षा कर्मचार्यामुळे उघडकीस आला. या दुर्दैवी पित्यास सध्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे. स्वतःच्या दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला दीडशे किमी दूर नेऊन त्याला एकटेच निराधारपणे सोडून त्याचा पोटचा मुलगा पलायन करतो, यावर वरवर विश्वास बसत नसला, तरी हे सत्य आहे.
एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने म्हणजे सुट्टीची मजा घेण्याचे महिने. याच कालावधीत मदर्स डे म्हणजे मातृदिन ही आपण 12 मे ला साजरा करतो. याच तीन महिन्यात ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती सीबीडी पोलीस ठाण्यातील महिला व मुलांकरिता असलेल्या सहाय्यक कक्षातील सोशलवर्कर आसावरी जाधव यांनी दिली. उच्चशिक्षित आणि उच्चवर्गीय महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. त्यांना काठीने टोचण्यापर्यंत मुलांची मजल जात असल्याचे आसावरी जाधव यांनी सांगितले. आई-वडिलांवरून वाद झाल्यास तरुण पिढी विभक्त होण्याची टोकाची भूमिकाही घेताना दिसत आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी कोठे चालली आहे, असा प्रश्न पडत आहे.
पनवेल-रसायनी रस्त्यावर असलेल्या कसळखंड येथील दातार इन्स्टिट्यूटमध्ये वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी संजय दातार हे दरवर्षी आनंदोत्सव साजरा करतात. रायगडसह नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील वृद्धाश्रमामधील 300 पेक्षा जास्त आजी, आजोबा यामध्ये सहभागी होतात. मराठी पद्धतीने दिवा ओवाळून प्रत्येकाचे स्वागत करण्यात येते निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य, ड्रामा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात येतात. या वेळी ‘कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटते. त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून मला समाधान मिळते असे संजय दातार सांगतात. चहा, नाष्टा व जेवण आग्रह करून वाढणारे आणि प्रत्येकाची चौकशी करणारे संजय दातार, प्रशांत नायर, चेतना अभ्यंकर व त्यांचे सहकारी पाहून या ज्येष्ठांचे डोळे पाणावतात.
खारघरच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील एमएसडब्ल्यू करणारे विद्यार्थी प्रतिभा शिंदे, पूनम कुटे, प्रणाली पाटील, सूचिता कांबळे, शोभा वाघमारे, हर्षाली चव्हाण व अजिंक्य गजाकोश हे आपल्या प्रोजेक्टसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, सचिव साहेबराव जाधव, गोपाल धारपवार, सुरेंद्रनाथ पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी, आपण परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आपली वेदना, दुःख विसरून काम करीत असतो. आपल्या संघाचे 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत. ते पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या कट्ट्यावर रोज सकाळ-संध्याकाळ एकत्र येतात. यामध्ये विविध क्षेत्रांतून निवृत्त झालेली वेगवेगळ्या प्रांतातील अनुभवी माणसे आहेत. आपल्या सोसायटीतील विजेचा किंवा पाण्याचा प्रश्न असो, नाही तर रेल्वे किवा एनएमएमटीच्या बसचा प्रश्न, तो सोडवण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांच्या कार्यालयात फेर्या मारतात. तो प्रश्न सुटल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. यामधील काही प्रश्न सुटले नाही म्हणून यांचे काही अडणार नसते. आजच्या तरुण पिढीला वेळ नसतो, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे ज्येष्ठ नागरिक करीत असतात.
शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा केला. त्यांचा सांभाळा न करणार्या मुलांना या कायद्यामुळे शिक्षा होऊ शकते, मात्र आई-वडील सगळे विसरून आपली तक्रार मागे घेत असल्यामुळे या कायद्याची भीती कोणाला वाटत नाही. या कायद्याखाली शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे, असे एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. शासनाच्या वृद्धाश्रमांची अवस्था खूप खराब आहे. तेथे ज्येष्ठ नागरिकांना साधे पांघरून मिळत नाही. बेडही व्यवस्थित नसतो, त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. फक्त कागदोपत्री उपक्रम घेतल्याचे दाखवले जाते, असे अनुभव या विद्यार्थ्यांनी सांगितले. फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच ठिकाणी चांगली सोय असते.
ज्येष्ठ नागरिक संघातील खेळीमेळीचे वातावरण आणि या वयातही स्टेज कार्यक्रम घेणे, महिला व पुरुषांचा घरच्या समस्या विसरून असलेला सहभाग हा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा वाटला. आपण आपल्या पुढच्या काळात असे काही तरी सेव्हिंग केले पाहिजे, असे वाटले.
-पूनम कुटे, ग्रुप लीडर
वृद्धाश्रमाला ‘केअर होम’ म्हणतात, पण नाव बदलले तरी घर ते घर असते. कुटुंबात राहण्यात आणि तेथे राहण्यात फरक असतोच. आयुष्यात लहान मूल, आई-वडील या भूमिका राबवताना
आपण खूश असतो, तसेच वृद्धत्वातही आनंदी राहिले पाहिजे.
–शोभा वाघमारे