Breaking News

माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा

अन्यथा उपोषण; मनसेचा इशारा

कर्जत : बातमीदार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून माथेरानमध्ये  पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्याचा प्रति एक हजार लिटरचा दर हा देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. येथे आलेल्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (एमजेपी)कडून पाणीपुरवठा केला जातो.हॉटेल मालकांना हा दर कमर्शियल तर स्थानिकांना डोमेस्टिक पद्धतीने अकारला जातो. लॉकडाऊननंतर एमजेपीने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीदरात वाढ केली. ही दरवाढ जाचक असल्याने येथील स्थानिक जनता मेटाकुटीला आली आहे. दरम्यान, पाणी दरवाढ  बारा दिवसांत कमी न केल्यास उपोषण करण्याचा इशारा मनसेने एमजेपीच्या अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष असिफ खान, सचिव रवींद्र कदम यांनी एमजेपीच्या कर्जत येथील कार्यालयात जाऊन उपअभियंत्यांना निवेदन दिले. माथेरानची पाणी दरवाढ बारा दिवसात कमी केली नाही तर श्रीराम चौकात उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

 दर तीन वर्षानंतर पाणी दरवाढ केली जाते. या दरवाढीचे सर्वाधिकार मंत्रालयात आहेत, असे एमजेपीकडून सांगण्यात आले.

एमजेपीने माथेरानमध्ये केलेल्या पाणी दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पर्यटन अजूनही बहरलेले नाही. अशात नागरिकांनी फक्त वाढीव पाणी बिले भरायची का? त्यामुळे पाणी दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी आम्ही उपोषणाचा इशारा दिला आहे.

संतोष कदम, मनसे शहर अध्यक्ष, माथेरान

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply