पनवेल : प्रतिनिधी
देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने सरकारने संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. संचारबंदी असल्याने कोणतेही सण, समारंभ जाहीर कार्यक्रम न करण्याचे आवाहन असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती नवीन पनवेलमधील डी. डी. विसपुते महाविद्यालयात प्रथमच पुस्तक वाचन करून ऑनलाइन
साजरी करण्यात आली.
महामानव, विधितज्ञ, साहित्यिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरी झाली. विसपुते महाविद्यालयात आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, नाचून मोठे होण्यापेक्षा, वाचून मोठे व्हा म्हणून विद्यार्थ्यांना दिवसभर कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे फोटो पाठविण्यास सांगितले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झुमची लिंक देऊन 87 विद्यार्थ्यांच्या व स्टाफच्या ऑनलाइन उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली. स्क्रीनवर टप्प्यायाटप्प्याने डॉ. बाबासाहेबांचे अनेक फोटो प्रदर्शित करण्यात आले. प्रा. नेहा म्हात्रे यांनी प्रास्ताविक केल्यावर विद्या पाटील व हर्षाली ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा. विनायक लोहार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांसमोर सादर केली व सर्वांना एक नवी दिशा दिली. यानंतर प्रा. विजय मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.