पाली : प्रतिनिधी
एसटी ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी मानली जाते, रस्त्यावर सकाळ, दुपार, सायंकाळी व रात्री सामान्यांच्या सेवेत धावणारी एसटी आता नजरेस पडत नसल्याने अनेकांची गैरसोय होतेच याबरोबरच काहींना चुकल्यासारखे वाटत आहे.
मागील महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकात प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकातील शेकडो फिरते विक्रेते, टपरीवाले, रसवंती चालक व दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता एसटी कर्मचार्यांचा संप अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न या सर्वांसमोर निर्माण झाला आहे.
पाली सुधागडसह जिल्ह्यात पनवेल, पेण, रामवाडी, अलिबाग, कर्जत, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, इंदापूर, पोलादपूर व महाड आदी बसस्थानकांवरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची ये-जा असते. या बसस्थानकात येणारे बसमधील प्रवासी हेच या फिरते विक्रेते, छोटेमोठे हॉटेल चालक, भाजी विक्रेत्या, टपरीवाले व दुकानदारांचे हक्काचे ग्राहक असतात, मात्र स्थानकात बसच येत नाही म्हटल्यावर प्रवासी तरी कुठून येणार? परिणामी हे व्यवसायिक पुरते हतबल झाले आहेत.
वडिलांचे बसस्थानकात छोटे दुकान आहे. महिनाभरापासून एसटीचा संप असल्याने खूप नुकसान झाले आहे. दुकानाचे भाडेदेखील भरावे लागते. दुकान दिवसभर उघडे ठेवूनही ग्राहक फिरकत नाहीत. कारण स्थानकात कोणी येतच नाही. योग्य तोडगा निघून लवकर एसटीचा संप मिटला पाहिजे.
-हेमंत राऊत, व्यवसायिक, पाली