Monday , January 30 2023
Breaking News

‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’ अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोलले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, असे सांगत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना ज्या पद्धतीने स्थानबद्ध करण्याबाबत घटना घडली, त्या एकूण सगळ्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी सरकारकडे त्यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे जात होते. त्या वेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आले. किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितले की, आपण अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्या वेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घालून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का, असा सवालही शेलारांनी केलाय. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असे सांगितले जाते त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खर्‍या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी या वेळी केली.

याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते की, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते. पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाण्यास रोखणे, त्यासाठी जे कारण दिले तेही संशयास्पद आहे. गुन्हेगार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हेही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेने गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात की, मुख्यमंत्र्यांना अवगत केले गेले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शेलार यांनी भाजपच्या वतीने केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत असेच दुर्दैवी चित्र आहे. समाज माध्यमांंवर जे बोलले त्यांना मारण्यात आले, एका निवृत्त नेव्ही अधिकार्‍याचा डोळा फोडण्यात आला, सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकांना घरात घुसून अटक करण्यात आली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बोलणे दखलपात्र गुन्हा करून त्यांना अटक करण्यात आली, दहशतवादी कारवाया राज्यात होतात त्याची माहिती पोलिसांकडे नाही. हे सर्व पाहिले की, राज्य अराजकतेकडे जाते आहे. अराजकता राज्यकर्ते माजवत आहेत. तर दुसरीकडे कायदेशीर मार्गाने तक्रार करणार्‍या नागरिकांना अटकाव केला जातोय, किरीट सोमय्या यांना पोलीस ठाण्यात जाण्यात अटकाव करण्यात आला, तसेच करुणा शर्मा या पोलीस ठाण्यात जात असताना त्यांना रोखण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, ट्विटरवर लखोबा लोखंडे नावाने ट्विटर खाते चालवणार्‍याला अटक करून न्यायालयात आणल्यानंतर शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली हे पाहता राज्यातील जनता असहाय्य झाल्याचे चित्र आहे. राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा, अशी स्थिती जनतेची आहे. राज्य अराजकतेकडे जाते आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोलले पाहिजे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.

मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार, पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply