Breaking News

मुंगूर तलावामुळे पाताळगंगेची गटारगंगा

खोपोली : प्रतिनिधी

मुंगूर मत्स्यपालन तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने पाताळगंगा नदीपात्र दूषित झाले आहे. मुंगूरपालनावर बंदी असतानादेखील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे तलाव राजरोस मत्स्यपालन करत आहेत. त्याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

खालापूर नगरपंचायत हद्दीत महड येथे नदीकिनारी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मुंगूर मत्स्यपालन केले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलाव आहेत. मुंगूर माशासाठी कोंबडीचे शिल्लक मांस व आतडी यांसारखे खाणे आणले जाते. अतिशय दुर्गंधीयुक्त खाणे तलावात टाकल्यामुळे पाण्यालासुद्धा घाण वास येतो. तलावातील पाणी काळसर गटारासारखे असून ठराविक दिवसांनी पाणी बदलताना तलावातील घाण पाणी थेट पाताळगंगा नदिपात्रात सोडले जाते. पाताळगंगा नदीवर कित्येक गावच्या पाणीयोजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे तलावातून सोडण्यात येणार्‍या पाण्यातून जंतूंचा शिरकाव होऊन आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.तलावातील नदीत सोडण्यात येणाच्या पाण्यामुळे परिसरातदेखील दुर्गंधी पसरत आहे. बेकायदेशीर चालणार्‍या मुंगूर मत्स्यतलावाकडे नगरपंचायत प्रशासनाची होत असलेली डोळझाक म्हणजे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असून याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाची पैदास केली जाते. सडलेले खाद्य मुंगूर माशांना खायला दिले जाते. तलावातील घाण पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे.स्थानिक प्रशासन कारवाई करत नसल्याने जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन देत उपोषण करण्यात येईल.

-निलेश जोगावडे, खालापूर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply