Breaking News

सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता : हेमंत कोंडिलकर

समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे, त्याला कारणे अनेक असतील पण शेतीकडे दुर्लक्ष आणि शेतीमधून पिकणारे पीक हे महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे. पूर्वी आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा एकमेव व्यवसाय होता आणि त्यामुळे प्रत्येक घरातील माणसे ही बाराही महिने शेतीत मग्न असायची. त्यामुळे काय व्हायचे की शेतीत गुंतले असल्याने शेतकर्‍यांची आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाची प्रकृती ठीकठाक असायची. त्यामुळे त्यांना शक्यतो कोणतेही आजार देखील जडायचे नाहीत. परिणामी शेतकरी कुटुंब तब्बल शंभरी गाठायचे. हे सत्य असून कोणीही नाकारू शकत नाही. त्यात दुसरीकडे शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या मागे धावणारा तरुण यामुळे पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि त्याच शेतीमध्ये काम करणारे हात कमी झाले.

आपोआप शेतीमधून पिकणारे उत्पादन कमी झाले आणि त्याचा परिणाम हायब्रीड बियाणे वापरून कमी श्रमात अधिक पीक घेण्यासाठी केमिकलयुक्त खतांचा फवारा शेतातील पिकांवर मारला जाऊ लागला. त्याचा परिणाम शेतात जोरदार पीक बहरू लागले, पण त्या पिकातून आपल्या शरीरात रासायनिक खतांपासून पिकवलेले अन्न आपल्या पोटात जाऊन शेतीतून निघणारे पीक आपल्या सर्वांच्या आरोग्यास अपायकारक ठरू लागले. त्यातून माणसाचे आयुष्यमान कमी झाले आणि आणि त्यासाठी केवळ रासायनिक खते हीच कारणीभूत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकार गेल्या काही वर्षात सेंद्रिय शेतीचा आग्रह धरू लागला असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शेतात गोमूत्र, शेण यांचा वापर सतत होत होता, त्यामुळे शेतातील जमिनीचा कस कायम राहत असे, मात्र शेतकर्‍यांनी यांत्रिक अवजारे यांचा अवलंब केला आणि शेतकर्‍यांच्या घरीच आलेली जनावरे ही देखील नाहीशी झाली. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर असलेली पिकांवर आपले जगणे सुरू आहे आणि त्यामुळेच आपल्या सर्वांचे आयुष्यमान कमी झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीसाठी अनेक योजना शेतकर्‍यांसाठी पुढे आणल्या आहेत. त्यातून शेतकर्‍यांना रासायनिक खतांच्या वापरापासून अलिप्त करायचे आणि देशातील नागरिक यास चांगले आयुष्यमान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सेंद्रिय खतांच्या निर्मितीवर भर दिला आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे लक्षात घेऊन आता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला असून शेतकर्‍यांच्या सेंद्रिय खतांपासून पिकवलेल्या पिकांना मिळणारे दर शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नत्तीकडे नेणारे आहेत. त्यामुळेच बाजारात शेतातील माल विक्रीसाठी नेल्यानंतर सेंद्रिय शेतीची माहिती नसलेल्या शेतकर्‍यांना दोन प्रकारचा माल दिसून येतो. त्यात सेंद्रिय खातांचा वापर करून पिकवलेला माल आणि रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेला माल ठेवलेला असतो. त्यातील सेंद्रिय खते वापरून पिकवलेला माल हा शेतकर्‍याला अधिक भाव देऊन जात असतो. हे आता शेतकरी मोठ्या बाजारात अनुभव घेत आहेत आणि त्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळलेला दिसून येतात.

सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता

सेंद्रिय शेतीचे आपल्या आरोग्यात असलेले महत्त्व लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील पदवीधर तरुणाने सेंद्रिय खते निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि नवी मुंबईतील उच्च पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळला. त्यामागे देखील एक कारण असून कोंडेकर या तरुणाचे काका हे आजारी पडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या वेळी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोंडिलकर यांच्या पोटात विषारी घटक अन्नातून गेले असल्याने तो आजार झाला आहे, असे स्पष्ट केले. शेतीची आवड असलेल्या या तरुणाने मग कर्जत तालुक्यातील गणेगाव येथील साई आनंद प्रेम आश्रमात सुरू केलेल्या कंपोस्ट खत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून सेंद्रिय खत निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केला.

केवळ खताची निर्मिती करून चालणार नव्हते तर त्या खतांचा वापर आपल्या शेतीत करून त्यातून चांगले उत्पन्न शेतकर्‍यांना मिळविता आले पाहिजे हे आपल्या शेतीत प्रयोग करून हेमंत यांनी सिद्ध केलेले आहे. त्याच वेळी तात्यांनी गावोगाव फिरून प्रयोशील शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन सेंद्रिय खतांचे महत्त्व पटवून दिले आणि शेतकर्‍यांना सेंद्रिय खते वापरण्यास तयार केले. हेमंत या तरुणाचा हा लढा गेली सहा वर्षे सुरू असून कर्जत, अंबरनाथ, खालापूर, पनवेल आणि मुरबाड तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांचा सेंद्रिय खतांचा वापर करून घेतलेल्या पिकांमुळे झालेला फायदा लक्षात घेऊन शेतकरी आता सेंद्रिय खते कुठे मिळणार याकडे आपला कल वळवू पाहत आहेत.

शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी गावातील, आजूबाजूच्या शेतकर्‍यांना सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास शेतकर्‍यांना होणार्‍या रासायनिक खतांच्या अमाप खर्च, कीटकनाशके यांचा वापर करूनही तयार झालेल्या भाजीपाल्याला बाजारात मिळणारे अत्यल्प दर यावर पर्याय म्हणून हेमंत ने त्यांचे मित्र भारत मुंबईकर या दोघांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी तालुक्यातील गोशाळेत उपलब्ध असलेल्या देशी गाईच्या शेण, गोमूत्र, गूळ, बेसन यांचा वापर करून जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडीखत यांचा वापर करून गावातील शेतकरी भास्कर गणपत कांबरी, विष्णू गणपत कांबरी यांना तयार केलेली खत, कीटकनाशके यांचा वापर करून भाजीपाला पिकवून तो भाजीपाला कृषी विभागाने सुरू केलेल्या आठवडा बाजारात महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेत विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

पोल्ट्री फार्मचालकांचा त्रास झाला कमी

हेमंत यांनी तयार केलेले सेंद्रिय खत केवळ भाताच्या शेतीसाठी किंवा भाजीपाला शेतीसाठी फायदेशीर ठरत आहे असे नाही तर कुकुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी हे सेंद्रिय खत मदतगार ठरत आहे. पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असताना पोल्ट्रीमधील काम करणार्‍या कामगारांना पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या विष्ठेतून येणार्‍या दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. त्यावर उपाय म्हणून जिवाणू कल्चर तयार केले व त्याचा प्रयोग कर्जत तालुक्यातील संतोष धोंडू खडे यांच्या पोल्ट्रीमध्ये जानेवारी 2021 ते मार्च 2021 या तीन महिन्यात फवारणी केली व त्याचा परिणाम असा झाला की पोल्ट्री फार्ममध्ये येणार्‍या दुर्गंधीतून मुक्तता झाली व तेथील पोल्ट्रीधारक आता पोल्ट्रीमध्ये झोपतात. हा यशस्वी प्रयोग तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केला तर परिसरातील नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता होईल व अल्पभूधारक शेतकर्‍यांना शेतीपूरक म्हणून कुक्कुटपालन व्यवसायात अर्थाजन किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. व पोल्ट्री फार्ममधील तयार होणार्‍या कोंबडी खतांचा वापर करून शेतकरी छोटे-मोठे खत प्रकल्प उभारून आत्मनिर्भर बनू शकतात. पोल्ट्री फार्ममधील कुकुटपालन करणारे शेतकरी यांच्याकडून सेंद्रिय खतांचा वापर केल्यांनतर दुर्गंधी गायब झाली आहे.

शेतकर्‍यांना प्रशिक्षण

हेमंत नामदेव कोंडीलकर यांनी विषमुक्त शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या खतांची माहिती व त्या खतांचे महत्त्व सरकारी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना चर्चासत्र, सेंद्रिय खतांचे शेतकरी बांधवांना प्रबोधन केले, तर शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतील, तसेच शेतकर्‍यांना पिकविलेला भाजीपाला आणि शेतमाल बाजारात विक्रीसाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे व सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी सरकारने अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन हेमंत कोंडिलकर यांनी केले आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply