अलिबाग : प्रतिनिधी
रुग्णाची आरोग्य तपासणी कशी करायची याचे प्रशिक्षण देताना आपल्या सहकारी शिकाऊ डॉक्टर महिलेशी शरीराशी लगट करणार्या एका प्रतिष्ठित डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना अलिबाग शहरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेने डॉक्टर विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अलिबाग शहरात या डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून त्यांची अलिबागेत ख्याती आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या पुढील डॉक्टरी सेवेत मिळावा यासाठी नवी मुंबई येथील पीडित महिला त्यांच्याकडे सराव करण्यासाठी तीन महिन्यांपासून येत होती, मात्र हे डॉक्टर तिला डॉक्टरी सेवेतील प्रशिक्षण देण्याचे सोडून तिच्या शरीराशी लगट करीत होते. पीडित महिलेने डॉक्टरांच्या या अश्लील वर्तनामुळे हैराण होऊन अखेर अलिबाग पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेने मंगळवारी 21 डिसेंबर रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन या डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टर फरारी असून दोन दिवसांपासून रुग्णालयही बंद आहे. फरारी डॉक्टरांचा शोध पोलीस घेत आहेत.