मुरूड : प्रतिनिधी
आज आयटी क्षेत्रात मोठमोठे पॅकेज नोकरी करणार्या लोकांना दिले जातात. वर्षाला लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे सतत काम करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर घालवण्यासाठी दोन-तीन दिवस बाहेरगावी फिरावयास येत असतात. अशा वेळी इतरांचा पैसा आपल्याकडे वळवता आला पाहिजे. यासाठी स्थानिक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे. पर्यटक जेवढे दिवस राहतील तेवढ्या दिवसात भोजनाबरोबरच शेतीमध्ये चालणारी कामे प्रत्यक्षात त्यांना अनुभवता यावी यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रात्यक्षिक होणे खूप जरूरीचे आहे. यासाठी शेतात चालणारी पेरणी, मळणी, रोपांचे संगोपन, बैलगाडी सैर अशा विविध गोष्टी देऊन कृषी पर्यटनाला चालना देऊन शेतकर्यांनी आपला विकास साधला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. उसरोली येथील आगरी समाज गृहात जागतिक शेतकरी दिनानिमित्ताने किसान क्रांती संघटना व किसान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील विविध उत्पन्न घेणार्या 20 शेतकरी जोडप्यांचा सत्कार शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. या वेळी उज्ज्वला बाणखेले आपल्या भाषणात बोलत होत्या. या वेळी महाराषट्र राज्याचे किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष टी. एस. देशमुख, उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर, माजी तालुका कृषी अधिकारी दिलीप भड, अध्यक्ष शरद काबुकर, अॅड. इस्माईल घोले, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रियाज बंदरकर, उपसभापती चंद्रकांत मोहिते, लीलाधर गोयजी, विनायकराव देशमुख, सुभाष चौधरी, संतोष पवार आदी उपस्थित होते. या वेळी उज्ज्वला बाणखेले यांनी सफेद कांदा फक्त अलिबाग तालुक्यात होत आहे. सफेद कांदा सुकवल्यावर त्याची परदेशात निर्यात होत असते. या कांद्याला खूप महत्त्व असून रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांनी सुद्धा त्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमात शैलेश नाना पाटील, तुकाराम वाघमारे, मच्छिंद्र पार्टे, गजानन पाटील व अन्य शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शेतकर्यांना नेहमी प्रोत्सहन व प्रेरणा देणारे रियाज अहमद कासीम बंदरकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.