Breaking News

सुधागडातील खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे बनलेय जिकिरीचे

सुधागड हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते, तीही स्थानिकांनीच तयार केलेली. तर काही रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड, खडी आणि खड्डे आहेत. या रस्त्यांची साधी डागडुजीदेखील झालेली नाही. स्थानीक प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना याची जाणीव असूनदेखील याबाबत त्यांच्याकडून काहीही उपाय किंवा तजवीज होतांना दिसत नाही.

सुधागड तालुक्यात सिध्देश्वर (खुर्द), कळंब, चेरफळवाडी, शिरसेवाडी, करंजाई यासह अनेक ठाकूरवाड्या, तसेच मढाळी, शिळोशी, पावसाळावाडी, दांड, गाठेमाळ, मुळशी, डुबेवाडी, दर्यागाव, चिवे, ढोकळेवाडी आदी आदिवासी व कातकरवाड्या आहेत.कणी, गौळमाळ, गोगुळवाडा, गोकुळवाडा, कोंडी आदी धनगरवाड्यांसह गोमाशी, दिघेवाडी, खांडसई, घोटवडे, शिळोशी, मढाळी, कामथेकरवाडी, आसरे, नवघर, धोंडसे, वाघोशी, वांद्रोशी, पाच्छापूर, कोंडगाव, फणसवाडी, कोशिंबळे आदी गावांना जाणार्‍या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांवर अक्षरशः मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी आणि माती बाहेर आली आहे. काही रस्त्यांची कित्येक वर्षे साधी दुरुस्तीदेखील झालेली नाही. असा खडतर आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावरून नागरिक, वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवास करतात. कधीतरी लोकप्रतिनिधी किंवा शासनाला जाग येऊन ते रस्ता करतील किंवा डागडुजी करतील या भोळ्या आशेवर येथील लोक जगत आहेत.

पूल धोकादायक

सुधागड तालुक्यातील घोटवडे गावाकडे जाणारा पूल खचला आहे. तसेच नांदगाव, नेनवली, पिंपळोली, मढाळी, शिळोशी, आवंढे, भेरव, पेडली, मुळशी, वासुंडे  येथील पुलांना कठडेदेखील नाहीत. त्यामुळे तेथून प्रवास करणे धोकादायक आहे. वाकण-पाली-खोपोली मार्गावर पाली, जांभुळपाडा व भालगुल येथील पूलदेखील धोकादायक झाले असून त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक होते आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. पावसाळ्यात पाली आणि जांभुळपाडा पुलावरील संरक्षक कठडे तुटले आहेत.

वाकण-खोपोली मार्गाची अवस्था बिकट

वाकण-पाली-खोपोली 548 (अ) राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. सद्य स्थितीत  हा अनेक ठिकाणी रस्ता फुटला आहे. कामदेखील अर्धवट अवस्थेत आहे. वाहन चालक व प्रवाशांना या मार्गावर खड्यांबरोबरच धुळीचा सामनाही करावा लागत आहे.

अष्टविनायकाच्या पालीत खड्ड्यांचे विघ्न

अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वराच्या पालीत अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. येथील  रस्ते ठिकठिकाणी फुटले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमूळे नागरिकांसह बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि वाहनचालकांची खूप गैरसोय होते. पालीतील सावंतआळी, रामआळी व मधल्याआळीपासून बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच मिनिडोअर स्थानक, भोईआळी, बसस्थानक रस्तादेखिल खराब झाला आहे. ग. बा. वडेर हायस्कूल, बुरुडआळी व बस स्थानकाजवळील मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर बल्लाळेश्वरनगर, धुंडीविनायकनगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारे रस्तेही फुटले आहेत. त्यातून मोठे दगड बाहेर आले आहेत.

पालीत कित्येक ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी रस्ते खोदले आहेत. मात्र जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर हे खड्डे सिमेंट किंवा डांबराने नीट बुजविले जात नाहीत आणि तेथे पुन्हा खड्डे पडतात. तसेच ग्रामपंचायती मार्फत  जलवाहिन्याची दुरुस्ती करतांना मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले जातात. तसेच जलवाहिन्यांना गळती लागून पाणी रस्त्यावर आल्यानंतर वाहने जावून तेथील रस्त्यावर खड्डे पडतात.

खराब रस्त्यामुळे हाल

पालीसह तालुक्यात खराब रस्त्यामुळे महिला, रुग्ण आणि वृद्धांची मोठी गैरसोय होते. शाळकरी मुले रोज या खडतर रस्त्यावरून पायपीट करत आपली शाळा गाठतात. त्यांचेही हाल होत आहेत. साधी दुचाकी चालविणेसुद्धा खूप अवघड जाते. त्यामुळे अनेकांना घरगुती सामान पाठीवर वाहून आणावे लागते. त्यामुळेच सुधागड तालुक्यातील रस्ते लवकर बनविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply