रसायनी : प्रतिनिधी
गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ यांनी सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने शेतकरी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 23) त्यांचा सत्कार करण्यात आला. मिनेश गाडगीळ यांनी भाताच्या तुसापासून फॅटी सिड व अल्कोहोल ज्याचा वापर बायोफ्युअलमध्ये होऊ शकतो, याचे संशोधन केले आहे. त्यांना वरील संशोधनासाठी केंद्र सरकारचे पेटंट प्राप्त झालेले आहे. त्यांनी धान्य टरफले, गोमूत्र व विविध पाल्यांच्या रसापासून शेतीसाठी नैसर्गिक स्प्रे बनवले असून शेतीमध्ये त्याचा वापर फार फायदेशीर ठरत आहे. वरील स्प्रे वापरल्याने पिकाना सर्व न्युट्रीयंटस मिळतात व कीड नियंत्रणही होते. श्री. गाडगीळ याना या संशोधनासाठी राज्य शासनाचा कृषीभूषण पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. शेतीमधील त्यांच्या या कामाचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा इनरव्हिल क्लब पनवेलच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी क्लबच्या अध्यक्ष सुलभा निंबाळकर, सचिव श्वेता वारंगे, खजिनदार कांचन मिरवणकर, सदस्य सुनीता जोशी, माधवी कानिटकर, शैला खाडिलकर, संजीवनी मालवणकर, स्वाती जोशी उपस्थित होत्या. सदस्य अश्विनी जोशी यांच्या विशेष पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता.