अलिबागच्या उपवन संरक्षकांना निवेदन
माथेरान : प्रतिनिधी
माथेरानमधील पॉईंटवर जे स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय करीत आहेत, त्यांची दुकाने कायमस्वरूपी करावीत, अशी मागणी येथील मनसेतर्फे गुरुवारी (दि.23) उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
माथेरान शहर मनसे प्रतिनिधींनी गुरुवारी अलिबाग येथे जावून उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. माथेरानमध्ये इतर कुठलाही व्यवसाय नसून स्थानिकांचे जीवन केवळ पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायीकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय करु नये. येथील विविध पॉईंटवर व्यवसाय करणार्या स्थानिकांची दुकाने कायमस्वरूपी करावित, त्यांच्याकडून नियम व अटींचे पालन करुन घ्यावे, मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय करु नये, असे या निवेदनात म्हटले आहे.
माथेरानमधील स्थानिक व्यवसायिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपवन संरक्षक आशीष ठाकरे यांनी यावेळी दिले. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेश कन्नूमल, अलिबाग शहर अध्यक्ष राजेश थळकर, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष आसिफ खान, सचिव रवींद्र कदम, वार्ड अध्यक्ष शैलेश घाग आदि यावेळी उपस्थित होते.