महाराष्ट्राला अनेक थोर वक्त्यांची परंपरा लाभली आहे. निवडणुका आल्या की या स्टार प्रचारकांची सवय महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहत नाही. विद्यमान स्थितीतही अनेक स्टार प्रचारक आहेत. त्यांच्याकडे भाषणाची वेगळीच कला आहे. दुर्दैवाने अनेक स्टार प्रचारक राजकीय पटलावरून कायमचे निघून गेले आहेत. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा…
लोकसभेच्या महासंग्रामाचा महाराष्ट्रातील अखेरचा अर्थात चौथा टप्पा सोमवारी पार पडत आहे. पहिल्या तीन टप्प्यांत शांततेत मतदान झाल्याने अखेरच्या टप्प्यातही शांततेत मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. या निवडणुकीतील प्रचाराने अवघा महाराष्ट्र गेले महिनाभर ढवळून निघाला होता. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, रिपाइं यांची महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांची महाआघाडी आणि वंचित बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना रंगतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्राधान्याने सांभाळली, तर शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्य ठाकरे यांना सोबत घेत भाजप, शिवसेनेसाठी जोरदार प्रचार केला. या स्टार प्रचारकांमुळे महायुतीच्या सर्वच सभा हाऊसफुल झाल्या. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांच्या स्थानिक नेत्यांसमवेत झालेल्या सभांमुळे निवडणुकीचा माहोल आणखी वाढत राहिला. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचण्यात महायुती निश्चित यशस्वी झाली असेच चित्र पाहावयास मिळाले. याउलट महाआघाडीत मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच महाआघाडीचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात फिरताना दिसले. या वेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी महाआघाडीच्या प्रचार मोहिमेत भागच घेतला नसल्याचे दिसून आले.अर्थात सध्या राज्यात काँग्रेसची बिकट अशीच अवस्था झाली आहे. ज्यांच्याकडे पक्षाची धुरा आहे ते अशोक चव्हाण हे काही मासलीडर नसल्याने त्यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपविली गेली नाही. शिवाय ते नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघातच वेळ देताना नाकी दम आला होता. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे ही मंडळी प्रचारात सक्रिय होती. सभा गाजविणारी मंडळीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्याने या वेळी महाआघाडीच्या प्रचाराची छाप मतदारांवर म्हणावी तशी पडलीच नाही. काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील ही नेतेमंडळी आहेत, पण त्यांच्याकडे गर्दी खेचून घेण्याची कला अवगत नसल्याने त्यांच्या सभांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही हे नाकारून चालणार नाही. यापूर्वी काँग्रेसकडे वक्त्यांची भलीमोठी फौज असायची. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पतंगराव कदम ही नेतेमंडळी फर्डे वक्ते म्हणूनही लोकप्रिय होते, हे कुणीही नाकारू शकत नाही.त्यामुळे देशमुख अथवा कदम यांच्या सभांना कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदारही आवर्जून हजेरी लावायचा. अशीच स्थिती राष्ट्रवादीबाबतही घडली आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर.पाटील यांची उणीव राष्ट्रवादीला निश्चित भासली असेल. कारण अस्सल ग्रामीण बाज लाभलेल्या या नेत्याकडे समोरच्या गर्दीला खेचणारे वक्तृत्व होते. त्यामुळे आबा बोलायला आले म्हटले की सारा माहोल एकाग्र होऊन जायचा. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्याप्रमाणेच भाजपकडेही गोपीनाथ मुंडे नावाची एक जादू होती. ग्रामीण भागाची पुरती नस ठाऊक असलेल्या या नेत्याकडे कमालीचे वक्तृत्वही होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे राजकीय परिवर्तन झाले, त्यात गोपीनाथ मुंडे यांचाही मोठा सहभाग होता हे अवघ्या महाराष्ट्राला चांगलेच ठाऊक आहे. दुर्दैवाने अशी सभांची मैदाने गाजवणारी नेतेमंडळी राजकीय पटलावरून कायमची लोप पावली व महाराष्ट्राचा राजकीय आवाजच अबोल झाला. या नेत्यांची आठवण महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रमोद महाजन. त्यांचाही डाव नियतीने असाच अर्ध्यावरती मोडल्याने त्यांनी गाजवलेल्या सभांची आठवणही नेहमीच स्मरणात राहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली आहे. तशी गर्दी खेचणारा नेता राज्यात पुन्हा निर्माण झाला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भाषण कला आहे, पण त्यांनी या वेळी त्यांच्या सभा या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतल्याची जोरदार टीका भाजपने केली आहे. अर्थात हा झाला राजकीय वादविवाद, पण महाराष्ट्रात जाहीर सभा गाजवणार्या वक्त्यांची आता चणचण भासू लागली आहे. जी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळी आहेत, त्यांच्यावरच आता राज्यातील जनता समाधान मानत आहे हे नक्की.
-अतुल गुळवणी (9270925201)