Breaking News

मतदारराजा जागा हो..!

आपल्या लोकशाहीप्रधान देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. याबरोबरच राज्यातील ‘मत’संग्राम संपुष्टात येईल. आतापर्यंत झालेली मतदानप्रक्रिया पाहता नवमतदार वाढले, पण मतदानाची टक्केवारी काही वाढली नाही. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन आपल्या परीने प्रयत्न, जनजागृती करीत असले तरी मतदानाचा एकूण टक्का वाढण्याऐवजी घटल्याचे चित्र आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघांमध्ये 63.04 टक्के मतदान झाले. दुसर्‍या टप्प्यात 10 जागांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी 62.88 आहे; तर 14 मतदारसंघांमध्ये तिसर्‍या टप्प्यात 62.37 टक्के मतदान नोंदविले गेले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या तीन टप्प्यांत आणि राज्यातील एकूण 31 मतदारसंघांत पुणे मतदारसंघाची टक्केवारी नीचांकी ठरली आहे. पुण्यात 49.84 टक्के इतकेच मतदान झाले. गेल्या निवडणुकीत पुण्यात 54.14 टक्के मतदान झाले होते. यंदा पुणेकर पन्नाशीही गाठू शकले नाहीत. त्यामुळे साहजिकच ‘हुशार’ समजल्या जाणार्‍या पुणेकरांची टर उडविली गेली. गमतीचा भाग सोडा, पण ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीला कमी मतदानाने गालबोट लागले. यातून मतदारांची उदासीनता दिसून आली. आजवर ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदान कमी होते असे पाहण्यात आले आहे, परंतु ग्रामीणबहुल रायगड मतदारसंघातील टक्काही यावर्षी घटला. 2014मध्ये रायगडमध्ये 64.57 टक्के मतदान झाले होते. या वेळी त्यात तीन टक्क्यांची घट होऊन हा आकडा 61.77 इतका राहिला.

निवडणुकीत मतांची टक्केवारी महत्त्वाची असते. निवडणूक मग ती कोणतीही असो जास्त मतदान झाले की सत्ताधार्‍यांविरोधात असलेला असंतोष मताच्या रूपाने बाहेर पडला असे मानले जाते. मागील वेळी देशभरात सर्वोच्च असे 66.4 टक्के मतदान झाले. तेव्हा प्रस्थापितांविरोधात लाट होती. आजवरचा हा अनुभव पाहता यंदा मात्र मतदान घटले. या वेळी चुरस असल्याने मोठ्या प्रमाणात मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात गेल्या वेळीपेक्षा टक्का घटला. त्यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक असून, कमी झालेले मतदान कुणाला तारणार आणि कुणाचा घात करणार याबाबत उत्सुकता आहे. हा झाला राजकीय भाग, पण मुळात मतदार मतदानाविषयी निरूत्साही का, हा खरा प्रश्न आहे.

बर्‍याचदा शहरी लोक निवडणुकीला मिळालेली सुटी बाहेर जाऊन फिरण्यात घालवतात. वास्तविक सकाळी मतदान करून नंतर दिवसभर कुठेही जाता येऊ शकते, परंतु अनेक उच्चभ्रू मंडळी कुणाचेही सरकार आले तरी आपल्याला काय फरक पडणार या आविर्भावात असतात. कुठे काही बिनसले की सोशल मीडियातून गळा काढण्यात हेच लोक आघाडीवर असतात. 

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मतदार जिल्ह्याच्या बाहेर वास्तव्यास असतात. यातील काही जण निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत नाहीत. यामागे वेगवेगळी कारणे असतात. अर्थात त्यांनी कोणतीही सबब न देता मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे; कारण अलीकडे खासगी आस्थापना, कंपन्यादेखील मतदान करण्यासाठी कर्मचार्‍यांना सवलत देतात. तरीदेखील अशा मतदारांसाठी वेगळा पर्याय निर्माण करणे गरजेचे बनले आहे. हल्ली विज्ञान-तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. एका क्लिकद्वारे बरेच काही करता येते. मग निवडणुकीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेतदेखील मतदारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला हरकत नाही.

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, संघटना विविध उपक्रम राबवत असतात. जनजागृतीपर कार्यक्रमही घेतात, परंतु 100 टक्के मतदान होत नाही. ते ध्यानात घेता त्रुटींमध्ये सुधारणा व कार्यपद्धतीत व्यापक बदल करून मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी अधिकारीवर्गाने घेतली पाहिजे. उष्णतेचा चढता पारा, मतदानावर टाकण्यात येणारा बहिष्कार हीदेखील मतदान कमी होण्यामागची कारणे आहेत, मात्र संपूर्ण टक्का हलवण्याइतकी ती प्रभावी नाहीत. मतदारांचा निरुत्साह हेच खरे कारण आहे. त्यामुळे मतदानसक्ती हाच पर्याय उरतो. 

एकीकडे काही लोक मतदानाकडे पाठ फिरवत असले तरी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून मतदानासाठी काय पण म्हणत संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा हक्क बहुसंख्य जणांनी बजावला. यामध्ये पंकज अशोक सोनटक्के यांचा आवर्जून उल्लेख करायला लागेल. मूळचे रोहा तालुक्यातील कोलाड येथील पंकज अशोक सोनटक्के मागील दोन वर्षांपासून कामानिमित्त ऑस्ट्रेलियात आहेत. तेथील साईनक्राफ्ट या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावला. जबाबदारीने मतदान करून योग्य व्यक्ती निवडून दिल्यास आपले प्रश्न, गरजा व मागण्या निश्चित सुटू शकतात. इतक्या दूरवरून येण्याची माझी हीच भूमिका होती, असे सांगून पंकज सोनटक्के यांनी मतदान न करणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे.

आधी लगीन लोकशाहीचे म्हणत अलिबाग तालुक्यातील नवखार येथे प्रवीण पाटील, वायशेत येथे रूपेश पाटील आणि मुरूड तालुक्यातील बारशीव येथील तुषार सचिन कासार यांनी विवाहाआधी आपला मतदानाचा हक्क बजावला. बेलकडे मतदान केंद्रावर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक नववधू उत्कर्षा हीसुद्धा रांगेत उभी होती; तर वयाचा बाऊ न करता महाड तालुक्यातील आमशेत येथील 110 वर्षांच्या गंगूबाई विठ्ठल चव्हाण आणि कांबळे तर्फे बिरवाडी येथील 107 वर्षीय सुलोचना गोविंद देशमुख या वृद्ध महिलांनी मतदान केले. यावरून हे लक्षात येते की इच्छा तिथे मार्ग. कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती आवश्यक असते. मतदानासाठीही ती लागू पडते. शेवटी मतदार हा राजा असतो. त्यानेही आपल्या मताचे दान देऊन आपले राजेपण जपावे.

देशाच्या चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघाचाही समावेश आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देशहिताच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानली जाते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही, पर्यायाने देश बळकट करू या!

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply