Breaking News

नवी मुंबईसाठी मार्गिका बांधा; अन्यथा ऐरोली-काटई पुलाचे काम बंद पडू!

आमदार गणेश नाईक आक्रमक

नवी मुंबई : बातमीदार

ऐरोली-काटई उन्नत पुलाचा नवी मुंबईकरांसाठी उपयोग झालाच पाहिजे. या पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचा प्रश्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या 15 जानेवारीपर्यंत मार्गी लावला नाही, तर या पुलाचे काम बंद पाडू आणि पालिका मुख्यालयातही आंदोलन करू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. सिडकोच्या वतीने प्राप्त सुविधा भुखंडांचे नियोजन करून प्रभागनिहाय सुविधा पुरविण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचनादेखील त्यांनी आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये केली.

या पुलाची निर्मिती करीत असलेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाने पालिकेकडून काही बाबींची पूर्तता होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जमीन संपादनाचा विषय असो की एमएमआरडीएला निधी देण्याचा पालिकेने त्यावर तत्परतेने कार्यवाही करावी. मार्गिकेच्या कामासाठी पालिकेने एका अधिकार्‍याची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली.

माजी आमदार संदीप नाईक यांनी या संदर्भात आयुक्तांना सूचना करताना पालिकेने एमएमआरडीए तसेच सिडको या दोन्ही प्राधिकरणांच्या संपर्कात राहण्यास सांगितले. या पुलावर नवी मुंबईत मार्गिका तयार झाल्यास ठाणे-बेलापूर मार्गावरील 40 टक्के वाहतुकीची समस्या सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिका 35 कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले.

संदीप नाईक पुढे म्हणाले की, पुलाच्या आड येणारा जलकुंभ आणि जमीन संपादनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तसेच सुविधा भूखंडांसाठी पालिकेने टप्प्याटप्प्याने सिडकोला पैसे देण्याची तयारी दाखवावी.सिडकोकडून प्राप्त होणार्‍या भूखंडांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात सोयीसुविधा पुरविण्याचा आराखडा तयार करावा. त्याची यादी करून सिडकोकडे ती सुपूर्द करावी. आरक्षणाबाबत येत्या 7 जानेवारीला या विषयी उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत पालिकेने ठासून भूमिका मांडावी. यावर पालिकेच्या वकीलांसोबत बोलून शहरहिताची भूमिका मांडण्याची तयारी आयुक्त बांगर यांनी दर्शवली.

या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, जयंवत सुतार, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply