Breaking News

‘निलिकॉन’च्या कंत्राटी कामगारांचा संप

रोहे : प्रतिनिधी

न्याय हक्क देण्याबाबत निलिकॉन कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येथील निलिकॉन कंपनीतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) सकाळपासून एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकार्‍यांबरोबर सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

रोहे तालुक्यतील धाटाव औद्योगिक क्षेत्रात खाण्याचा रंग तयार करणार्‍या निलिकॉन फ्रूड डाईस अँड केमिकल्स लिमिटेड  कंपनीत सुमारे 350 कंत्राटी कामगार काम करतात. या कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. ही संघटना या कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांच्याकडे पत्रव्यवहार करीत आहे, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्तांकडे गेल्या आठ महिन्यांत अनेक बैठका झाल्या. पण कंपनी व ठेकेदार यांच्याकडून सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली नाही. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात बैठक घेऊन संघटनेच्या मागणीपत्रावर 10 दिवसांत निर्णय घेण्याची सूचना केली होती. मात्र त्याला एक महिना उलटला असून, कंपनी व ठेकेदार यांनी मागणीपत्रासंदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे कंपनीतील सुमारे 300 कंत्राटी कामगारांनी व्यवस्थापन व ठेकेदारांचा निषेध करण्यासाठी बुधवारी सकाळी 7 वाजता जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. या आंदोलनात जय भारतीय जनरल कामगार संघटना अध्यक्ष व भाजप कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, जिल्हा संघटक विवेक अभ्यंकर, तालुका संघटक रवींद्र कोरडे, भाजप  कामगार आघाडी रोहा तालुका अध्यक्ष प्रवीण शिर्सेकर, उपाध्यक्ष गणपत काजारे, रत्नाकर ओक, निलिकोन युनिट अध्यक्ष विनोद मोरे, सरचिटणीस प्रकाश भगत, युनिट दोन अध्यक्ष अरविंद ताडकार, सरचिटणीस किसन कडव, कल्पेश मोरे, प्रशांत कोकणे  आदींसह कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, संप सुरू होताच निलिकॉन कंपनी व्यवस्थापनाने   कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना

चर्चेसाठी पाचारण केले व  कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी यांच्याबरोबर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे लाक्षणिक संप दुपारनंतर मागे घेण्यात आला, अशी माहिती रवींद्र कोरडे यांनी दिली.

कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कंपनी व्यवस्थापन व ठेकेदाराबरोबर पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र ते वेळकाढू भूमिका घेत आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूचना देऊनही कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही. याउलट 14 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. कंपनी व्यवस्थापन  आणि ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी लाक्षणिक संप केला.

-जितेंद्र घरत, अध्यक्ष,

जय भारतीय जनरल कामगार संघटना

निलिकॉन कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी बुधवारी सकाळपासून लाक्षणिक संप सुरू केला होता, मात्र कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून सकारात्मक भूमिका घेतल्याने दुपारनंतर संप मागे घेण्यात आला. -रवींद्र कोरडे, तालुका संघटक, भाजप कामगार आघाडी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply