पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील सर्व रिक्षा चालकांनी गणवेश परिधान केल्याचे पाहायला मिळालेे. तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन होत असल्याचे गुरुवारी (दि. 30)पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी रिक्षा थांब्यावर अचानक दिलेल्या भेटीत पहावयास मिळाले.
मागील काही दिवसांपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षा चालकांवर नवी मुंबई वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेलमध्ये विशेष कारवाई मोहिम राबविण्यात आली होती. त्या धर्तीवर पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 28 डिसेंबर 2021 या दरम्यान शहरातील एकूण 830 रिक्षांवर कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 11 रिक्षा चालकांचे लायसन्सदेखील निलंबित करण्यात आले होते. पनवेल शहरातील विना गणवेश, विना बॅच, पुढील सीटवर प्रवासी बसवणे याप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाया करण्यात आल्या होत्या.
पनवेल शहर वाहतूक विभागाच्या कारवाईचा धसका घेऊन पनवेलमधील रिक्षा चालकांनी गणवेश परिधान केले असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे गणवेशावर बॅचदेखील असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक विभागाच्या या कारवाईचा परिणाम म्हणून सकारात्मक बदल दिसून आल्याने याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.