Breaking News

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या महिलांची विजयी पताका

जबलपूर : वृत्तसंस्था

बहुप्रतिक्षित वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद  स्पर्धेतील दोन्ही गटांची अंतिम फेरी अपेक्षेप्रमाणे कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये रंगली, परंतु यंदा महाराष्ट्राच्या महिलांनी 2019मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला धूळ चारून जबलपूरमध्ये विजयी जल्लोष केला, मात्र रेल्वेविरुद्ध पुरुषांचे सलग दुसर्‍यांदा विजेतेपद हुकले आहे.  महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विमानातळ प्राधिकरणावर 13-11 असे प्रभुत्व गाजवले. कर्णधार प्रियंका इंगळे (1.30 मिनिटे संरक्षण, 2.10 मि. व आक्रमणात 3 गडी) महाराष्ट्राच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या ‘राणी लक्ष्मीबाई’ पुरस्काराने गौरवले. तिला रेश्मा राठोड (1.40 मि., 2 मि., 2 गडी), अपेक्षा सुतार (1.30 मि., 1.50 मि., 1 गडी) यांनी अष्टपैलू साथ दिली. विमानतळाकडून प्रियंका भोपी, ऐश्वर्या सावंत चमकल्या. पुरुषांमध्ये महाराष्ट्र-कोल्हापूरच्या 11 खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वेने अंतिम फेरीत 14-13 असे एक गुण व 1.40 मिनिटांच्या फरकाने हरवले. महेश शिंदे (1.10 मि., 2 मि. 2 गडी), अक्षय गणपुले (1.10 मि., 1.30 मि.) आणि विजय हजारे (1.20 मि, 1 गडी) यांनी दमदार कामगिरी केली. महाराष्ट्राकडून दुखापतग्रस्त प्रतीक वाईकर (1.30 मि., 1 मि., 1 गडी), कर्णधार सुयश गरगटे (1.10 मि., 1.40 मि., 1 गडी) यांनी चिवट झुंज दिली.

मागील वेळेस अंतिम फेरीत हरल्यामुळे या वेळी स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण सर्व खेळाडूंवर होते. माझ्या कामगिरीचे श्रेय महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांसह राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या अविनाश करवंदे सरांना जाते.

-प्रियंका इंगळे, महाराष्ट्र

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply