Breaking News

‘अटल करंडक’ एक शिस्तबद्ध एकांकिका स्पर्धा; परीक्षकांनी केले कौतुक

पनवेल : नितीन देशमुख
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या वेळी स्पर्धेच्या परीक्षकांनी स्पर्धेचे कौतुक केले आहे.
स्पर्धेतील एकांकिकांमध्ये सामाजिक जाणीव दिसून आली : विजय केंकरे
अटल करंडकचे आयोजन उत्तम. आतापर्यंत पाहिलेल्या एकांकिका चांगल्याच होत्या. 50 एक वर्षे झाली एकांकिका बघायला सुरुवात होऊन. शाळेत असल्यापासून बघतोय तो बदलता प्रवास बघायला मजा येते. आता एकांकिकांच्या विषयात, सादरीकरणात आणखी बदल होतोय. तो बघण्यात मजा आली. पुढचे जनरेशन हे अधिक हुशार असते ते अधिक चांगल्या पद्धतीने विचार करते त्यांना उत्तम तंत्र अवगत आहे.
मला बर्‍याचशा एकांकिकांत सामाजिक जाणीव दिसून येते. या मुलांना आता माध्यमामुळे असेल किवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे असेल सामाजिक जाणीव झाल्याचे लक्षात येते ती त्यांच्या सादरीकरणातून दिसून येते. लेखनापासून प्रयोगापर्यंत दिसते. या स्पर्धेतही ती दिसून येते. सर्वसाधारणपणे अंतिम फेरीत पाच एक एकांकिका  असतात. इथे मात्र 25 आहेत आणि त्या एका ठिकाणच्या नाहीत. सबंध महाराष्ट्रातून आल्याने एक पट उलगडला जातो. त्याकरिता ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे. आमच्या वेळेस ठोकताळे होते. अमुक केले, तमुक केले तर स्पर्धेत पारितोषिक मिळेल. कोठेतरी त्यातही आता बदल व्हायला लागलाय. मी 87च्या सुमारास पुण्याला राजा नातूनी एकांकिका महोत्सव भरवला होता. तेव्हा मी असे म्हटले होते की एकांकिका स्पर्धा बंद व्हायला पाहिजेत आणि आशा प्रकारचे एकांकिका महोत्सव व्हायला पाहिजेत.
कारण एकांकिकांत एवढे ठोकताळे आले आहेत की कलावंत खर्‍या अर्थाने  व्यक्त होणेच बंद झाले आहे. पण आज मला वाटले की नाही ही मुले व्यक्त होत आहेत. त्यांना व्यक्त व्हायचे आहे. विशेषतः स्त्रीप्रधान एकांकिका बघायला जास्तच आनंद होत आहे.
कोरोनानंतर जवळ जवळ पावणेदोन वर्षानी प्रत्यक्ष पुन्हा लोक नाटक बघायला लागले आहेत. त्यामुळे उत्साह आहे. आठ वर्षे ही स्पर्धा सुरू आहे म्हणजे यांचे आयोजन एकूणच चांगले असणार, पण कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेऊन करताहेत. एक सोडून एक बसायला लागतेय अन्यथा नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले असते याची मला खात्री आहे.
बिनचूक आणि कोणताही गोंधळ नसलेली स्पर्धा : संजय मोने
मी आतापर्यंत ज्या स्पर्धेला गेलो त्यामध्ये इथले आयोजन उत्तम  आहे. या मुलांना जी कामे दिली आहेत ती उत्तम करीत आहेत की माला कोणत्याच बंधनात अडकून राहायला आवडत नाही, पण मला वाटते ही मुले सांगतात ते ऐकावे. त्यांना जे सांगितले आहे त्याचे आपण पालन करावे. त्याचे परिणाम दिसतात बिनचूक, वेळेवर, कोणताही गोंधळ न होता सुविहित स्पर्धा होते.
स्पर्धा बघायला मला जाम आवडते, पण पूर्वी प्रेक्षक म्हणून जायचे. मजा मस्ती धम्माल असायची. आता वयोपरत्वे आब राखून बसायला लागते. त्यामुळे फारशा स्पर्धांना जाता येत नाही. पावणेदोन वर्षे तर काही नव्हतेच, पण स्पर्धा 1987-88पासून सातत्याने बघतोय. मजा वाटते, नवीन नवीन प्रकार बघायला मिळतात, नवीन नवीन मुले येतात. आमच्या काळात एकांकिका व्हायच्या. त्यामध्ये 25 एकांकिका झाल्या, तर त्यामध्ये एखाद-दोन एकांकिकांमध्ये खरंच एक वेगळा असा विचार मांडलेला असायचा. पुढे पुढे त्याचा आकृतीबंध ठरत गेला. आखीव, रेखीव, ठाशीव आशा एकांकिका व्हायच्या. सगळे ठरवल्यासारखे म्हणजे मुलांचे, शाळेचे स्नेहसंमेलनाचा विस्कळीतपणा पण ती एक गंमत असते आणि एक सैन्याचे संचलन असते. ते अत्यंत देखणे दिसते. ते आखीव रेखीव असते, पण ते मनापासून होते की नाही माहीत नाही; होत असेलही कदाचित. शिस्तीचा भाग थोडासा जास्त असेल. तशी पूर्वीची जी गंमत होती ती आता थोडी कमी झालेय, पण विचार अत्यंत वेगळे प्रगल्भतेने मांडले जातात. स्त्री हा विषय घेऊन एकांकिका होताहेत. एकच गोष्ट खटकते; पूर्वी शब्दप्रधान, विषयप्रधान एकांकिका असायच्या. आता त्या काही वेळेला आंगीक हालचालीकडे जातात. त्याला कारण आता जी मुले काम करतायत त्यांची मागची पिढी आहे. कारण त्यांच्या मागच्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीला त्यांच्या मागच्या पिढीने जे सांगितले ते आम्ही त्यांना का सांगितले नाही माहीत नाही. कदाचित आम्ही स्वार्थी किवा धूर्त होतो. म्हणून पुढे दिले नाही आणि म्हणून त्यांनी आपापला मार्ग शोधला, परंतु त्याच्यात नाट्य हा प्रकार लागतोच. नाटक, एकांकिकेमध्ये विचार कोणताही मांडा, पण त्यात नाट्य लागतेच नाहीतर लोक खिळून राहत नाहीत. लोक खिळून राहिले तर त्यांच्यापर्यंत ते विचार पोहचतात.
या स्पर्धेत मी ज्या एकांकिका पाहिल्या त्यामध्ये सलग एकांकिका सुरू झाली आणि एकांकिका संपली अशी एक प्रवेशी एकांकिका फार कमी पाहायला मिळते. 2-4 किवा 5-10 सेकंदांचे एक दृश्य हा उघड सांगायचे तर छोट्या पडद्याचा प्रभाव किवा प्रादूर्भाव आहे. तुकड्या-तुकड्यातून एकसंध परिणाम साधला जात नाही. स्पर्धा जिंकता येते. गंमत आहे पण तसा काय गमती वापरून संसार ही सुखाचे करता येतात, परंतु ते चांगले असतातच असे नाही. हळू बोला आणि सावकाश बोला यातला फरक कळत नाही म्हणजे खणखणीत, ठणठणीत आवाज असलेले 50 अभिनेते पुरेसे. आता काही वेळा ऐकूच येत नाही, काही वेगळे विषय घेऊन एखादा दिग्दर्शक सांगतो तो विषय काय आहे. व्यक्तिरेखा काय आहे हे त्यामुळे समजतच नाही. त्यामुळे पोपटपंची केल्यासारखे वाटते. तो विषय  काय आहे ती व्यक्तिरेखा काय आहे हे आधी सांगायला हवे आता ते शक्य आहे. त्याकडे दुर्लक्ष होते असे मला प्रकर्षाने वाटते. त्यामुळे असे म्हणावसे वाटते की, तालीम करताना एकदा सर्व नटांना आख्खी तालीम बोंबाबोंब करून बोंबलून म्हणायला लावा मग हळूहळू त्यांचा आवाज कमी करा आवाज ऐकू गेला पाहिजे. संवाद ऐकू जाण्यासाठी लिहिले जातात. नाहीतर मूक एकांकिका झाली असती. त्याबाबतीत प्रकर्षाने सुधारणा करायला हवी.
महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना उत्तम प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा : मकरंद अनासपुरे
स्पर्धेचे आयोजन खूप चांगले आहे. आठवे वर्षे आहे. महाराष्ट्रभरातील सर्व रंगकर्मींना एक उत्तम असा प्लॅटफॉर्म म्हणून या उपक्रमाकडे बघितले पाहिजे. तरुणाईला सतत काही मांडायचे असते. तरुण रंगकर्मीकडे वेगवेगळे विषय असतात. त्यांची मांडण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीने अभिप्रेत असते. ती तसे मांडतात. त्यात चुका होत असल्या, तरी त्यांचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आणि महत्त्वाचा असतो, असे मला वाटते. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना तो मिळालेला आहे. या स्पर्धेचे आयोजन अतिशय सुंदर आहे. मला असे वाटते की आशा तर्‍हेचा उपक्रम सतत सुरू राहावा.
या स्पर्धेत आतापर्यंत जास्त स्त्रीप्रधान, स्त्रीला महत्त्व देणार्‍या गंभीर एकांकिका पाहायला मिळाल्यात. विनोदी  एकांकिकाचे प्रमाण खूपच अल्प आहे याचे कारण मला समजले नाही, पण विनोदी एकांकिका असणे खूप गरजेचे आहे. त्याने एकतर विनोदाची नवीन पिढी दूरदर्शन माध्यमाला किवा नाटकाला मिळेल खूप चांगले विनोदी कलाकार घडतील. त्यामुळे विनोदी एकांकिका करायला हरकत नाहीत, पण दोन वर्षाचा आपला जो अनुभव आहे या आजारपणाचा, कोरोनाच्या परिस्थितीचा परिणाम असेल म्हणून गंभीर आशय आणि विषय जास्त दिसतात, असे मला वाटते ही परिस्थिती निश्चित बदलेल. दोन दिवस आम्ही बघतोय. एकांकिकांचे सादरीकरण, त्यामधले वैविध्य बघतोय. त्या तरुणांचा उत्साह बघतोय सगळेच वाखाणण्यासारखे आहे. एक शिस्तबद्ध अशी  एकांकिका स्पर्धा या अटल करंडकने आम्हाला दाखवली. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. खूप छान मजा येते. या रंगकर्मींना मनापासून हार्दिक शुभेच्छा. अटल करंडक स्पर्धा चिरायू होण्यासाठी ही शुभेच्छा.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply