Breaking News

नवी मुंबईत वाढवल्या कोरोना चाचण्या

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी उपाययोजना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे.

याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल दोन लाख 18 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात एक लाख 63 हजार 506 अँटिजेन तर 52 हजार 910 आरटी-पीसीआर टेस्टचा समावेश आहे. दिवसाला जवळपास आठ हजार नागरिकांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 13 लाख 94 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वांत जास्त असणार्‍या गर्दीच्या ठिकाणी एपीएमसीच्या बाजारपेठांमध्ये एका दिवसात 2000 चाचण्या होत आहे. त्यानुसार दररोज संध्याकाळी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांशी वेबसंवादद्वारे चर्चा केली जात आहे. यात कोरोनाविषयीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

दैनंदिन वेबसंवादामधील चर्चेतील निरीक्षणानुसार रुग्ण आढळलेल्या इमारतीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लक्षणे नसलेली परंतु कोविडची लागण झालेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी टेस्टींग उपयुक्त ठरत असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, टेस्टिंग हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास केल्या जाणार्‍या टेस्टिंगला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply