देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र बदलेल असे वाटत असतानाच कोरोना महामारी देशात पुन्हा डोके वर काढू लागली होती. अशातच मूळ कोरोना विषाणूसह नवा उत्प्रेरक ओमायक्रॉनने भीती वाढविली. अतिशय वेगाने पसरणारा ओमायक्रॉन उत्प्रेरक तितकाच घातक असल्याचे म्हटले जात होते. प्रत्यक्षात मात्र त्याचा बार फुसका ठरला, पण आधीच्याच विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. त्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली. इतकी की मागचे सारे विक्रम मोडीत काढले गेले. रुग्ण वाढतच होते, परंतु आधीसारखी चिंता करण्याजोगी परिस्थिती नव्हती. याचे कारण लसीने आपले काम एव्हाना सुरू केले होते. तिसर्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण होत असली, तरी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेऊन, आराम करून बरे होऊ लागले. यामुळे रुग्णालये आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवरही मागच्यासारखा ताण पडला नाही. कडाक्याच्या थंडीने मात्र अनेकांची झोप उडविली. आपल्या भारतात कधी नव्हे इतका गारठा पडून सर्दी, खोकला, ताप यांची साथ आली आणि तिने सार्यांना अक्षरक्ष: ‘गार’ करून टाकले. थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. तोही येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. हल्ली बदलत्या हवामानामुळे केव्हाही अवकाळी पाऊस, गारपीट होत असते. मग संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असते, परंतु त्याचीही सवय आता होऊ लागली आहे. संकटे येत राहतात. अशा वेळी त्यावर मात कशी करायची हे महत्त्वाचे असते. सुदैवाने आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही बलाढ्य देशांच्या तुलनेत कोरोना महामारीच्या लाटांनंतर भारत नव्याने उभा राहिलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जगात सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात राबविली गेली. या मोहिमेत नुकतेच देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 164 कोटी 36 लाख 66 हजार 725 लसमात्रा मोफत पुरवल्या आहेत. अजून 12 कोटी 43 लाख 49 हजार 361 लसमात्रा देण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात शंका, भीती, संभ्रम होते. ग्रामीण भागात तर लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत होती. हळूहळू चित्र बदलले. लोक स्वत:हून केंद्रात येऊन लस घेऊ लागले आणि त्याचे चांगले परिणाम सध्या पाहावयास मिळतात. प्रगत राष्ट्रे कोरोनाच्या लाटांमध्ये हतबल झाली, परंतु आपला देश कोरोनाची तिसरी लाट थोपवून धरण्यात यशस्वी ठरला, हे आपण अभिमानाने सांगू शकतो. बूस्टर डोसनंतर यामध्ये आणखी मजबुती येईल. अर्थात, परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोविड विषाणूचे पूर्णत: उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे कोरोनाविषयक नियम पाळावे लागणार आहेत. येत्या काळातही सर्तक राहून आणि काळजी घेऊन आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे.