Breaking News

दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज

 पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी  नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले.

स्मार्ट व्हिलेज अंतर्गत दिवाळे गावात सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी व फळ मार्केट तसेच सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता 15 कोटी रुपये अपेक्षित खर्च करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास  मदत मिळणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे.

दिवाळे गाव आमदार मंदा म्हात्रे यांनी दत्तक घेतल्यानंतर या गावामध्ये विविध नागरी सुविधांचा विकास होत आहे. गावकर्‍यांसाठी शासकीय योजना आणल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार म्हात्रे यांनी गावाचा पाहणी दौरा केला.

या वेळी भाजप महामंत्री निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका भारती कोळी, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अजय संखे, विद्युत विभागाचे सुनील लाड, बेलापूर विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती, संजय पाटील, कैलास गायकवाड, अनंता बोस यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

‘इतरही गावांचा विकास करणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण  विकास व्हावा, याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज तयार करावे असे स्वप्न साकारले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजना साकारत आहे. सन 2004  सालापासून दिवाळे गाव हे मी दत्तक घेतले असून हे गाव भविष्यात  स्मार्ट व्हिलेज होणार आहे. दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार आहेत, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply