Breaking News

टाकीचे घाव सोसल्यावरच कलाकार घडतो!

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक आणि स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला. नवोदित कलाकारांना या स्पर्धेतून काही शिकायलाही मिळाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने यासारखे कलाकार मोठे झाले, त्यासाठी त्यांना कष्ट तर करावेच लागले पण त्याचबरोबर प्रयोग सुरू असताना आणीबाणीचा प्रसंग आल्यावर तो कसा निभावून नेला याचे किस्से  सांगून त्यांनी कलाकार कसा घडतो याची जाणीव करून दिली.  म्हणूनच म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

मकरंद अनासपूरे यांनी 28 वर्षापूर्वी मुंबईत येऊन  पहिल्या नाटकात काम केले. त्यावेळी आपल्याला दिग्दर्शकाचे महत्व काय  असते, हे  कळल्याचे सांगताना  अनासपूरे म्हणाले की, त्या नाटकात काही मातब्बर व  मोठे नट होते. माझ्या पहिल्याच स्टडिंगला एका मातब्बर नटाने अपमान केला. मला असे वाटले की, आपण सगळे सोडून घरी जावे. पाहिल्याच वेळी इतक्या मोठ्या नटाने अपमान केल्यावर असे वाटणे साहजिक आहे. सामान उचलून घरी जावे किंवा केळी विकावी, हा विचार सुरू असताना दुपारच्या जेवणाला दिग्दर्शक माझ्याकडे आले. माझी छोटीशी भूमिका होती, त्यांनी मला दीड तास समजून सांगितले की, तू श्रेष्ठ आणि चांगलाच नट आहेस, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तुला या नाटकातून कोणीही काढू शकत नाही. अपमान केला तर सहन कर. कारण ही तुझी सुरुवात आहे. नाटकाच्या पहिल्याच सादरीकरणाला माझ्या एन्ट्रीला टाळ्या आल्यानंतर  त्या  मान्यवर  नटाने जिन्या खालच्या अंधारात माझी माफी मागितली. जर सर (विजय केंकरे) नसते तर कदाचित मी कोठे तरी केळी विकत असतो.

अंधार यात्री एकांकिका स्मशानात रहाणार्‍या लोकांवर होती. त्यात मकरंद अनासपुरेची बापाची तर मंगेशची  मुलाची भूमिका  होती. बापाचे आणि मुलाचे भांडण होते. मुलाला त्या परंपरेत राहायचे नाही. त्याला शहरात जाऊन काही तरी करायचे आहे. तो बंड करून बापाशी भांडून शहरात जातो. त्याला काम मिळाल्यावर तो वडिलांना सांगायला येतो. वडील वारलेले आहेत. तो बसून चिता पेटवतो आणि त्या चितेच्या प्रकाशात त्याचे शेवटचे स्वगत आणि प्रकाशाच्या दिशेने वाटचाल असे दृश्य असते. चिता स्टेजवर पेटवायची होती. त्यासाठी आमचा एक मित्र बसवला होता. त्याला रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड दिला होता. मंगेशने फक्त माचिस पेटवायची आणि ती एका बोळ्याला लावायची, ते पेटत जाणार आणि सगळीकडे अंधार चिता पेटलेली आणि त्याचे स्वगत. पण सीन सुरू झाला, त्यावेळी मागे बसलेला शिव्या देत होता. त्यामुळे माझ्या लक्षात आले की, चिता पेटलेलीच नाही. तेव्हा मला कळलं की काही तरी घोळ झाला आहे. मात्र मी मेलेला असल्याने मानही वळवून बघू शकत नव्हतो. मी एक डोळा किलकिला करून पहिले तर वरचा लाईट चालू. म्हटलं घडलं काहीतरी. सीन संपला. पडदा पडल्यापडल्या लगेच स्टेजवर भांडण. काय नालायक आहेस. एक माचिस पेटवायची, तेवढं नाही जमल. मंगेश  म्हणाला माचिसमध्ये एकच काडी पेटवताना गूल तुटलं ना. आता गूल शोधू का, संवाद बोलू. तेव्हापासून सिगारेट पिणारे मित्र कोणत्याही प्रयोगाला बोलवायचे नाहीत, असे ठरवून टाकले.

संजय मोने यांनीही त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. परळला नरे पार्कमध्ये आमच्या नाटकाचा प्रयोग होता. एका नटाला तारीख दिली नव्हती. तो ठाण्याला राहायचा. त्यावेळी मोबाईल नव्हते. त्याला घरी फोन केला. त्याच्या आईने सांगितले, तो नाटकाच्या चर्चेसाठी गेला आहे. मग तिथे फोन केला. त्याला ताबडतोब येण्यास सांगितले. तो निघाला.  तो येईपर्यंत वेळ जाणार. दोन अंकी नाटक संपायला उशीर होणार. पहिल्या अंकाच्या सुरुवातीलाच त्याचा प्रवेश होता. बाकीचे कलाकार लांबून आलेले, त्यांना रात्री जायला उशीर होणार म्हणून मी सांगितले की, आपण दूसरा अंक पहिला करू या. माझ्या बरोबरची एक कलाकार म्हणाली, असे कसे. मी तिला सांगितले. दूसर्‍या अंकातले वाक्य तू कधी बोलतेस. आल्या बरोबर एक चहा आणि संपल्यावर एक चहा पितेस. म्हणजे दोन चहा घेतल्या नंतर जी वाक्य बोलायची आहेत, ती आज एक चहा घेतल्यानंतर बोलायची. आम्ही दूसरा अंक केला. त्यामध्ये एका माणसाचा खून होतो आणि त्याचा तपास. मग  पहिला अंक सुरू केला. या खुनातील काही प्रश्नांची उत्तरे  मिळत नाहीत म्हणून आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून करू या, म्हणत दूसरा अंक केला. कोणालाही काहीही कळले नाही.

यावेळी मराठीचा वापर कसा करावा, याबाबतही संजय मोने आणि विजय केंकरे यांनी लेखक आणि दिग्दर्शकांची शाळा घेतली. बँकेत जाण्यासाठी सोबत लागत नाही. हल्ली एकांकिकेत सोबत हा शब्द वारंवार मराठी बातम्या बघितल्यामुळे येतो. तू माझ्या सोबत चल. श्रीखंडा बरोबर भाकरी खायची नसते. बँकेत सोबत नसते, जिथे भीती असते किंवा साथ असते तिथे सोबत असते.  बँकेत माझ्या बरोबर चल, बँकेत मला दोन लाख रुपये भरायचे आहेत.  माझ्या सोबत चल एवढाच फरक असतो. तो कळत नाही, कोणी सांगणार नाही. तो जरा बघा. माझी मदत म्हणतात मालिकांमध्ये बघून, तसे नव्हे मला मदत आहे. करुयात, जावूयात, बोलूयात , राहूयात असा ’त’  नसतो.  ’त’  वरुन  ताक भात ओळखायचा असतो तरी असा ’त’ नसतो कधी. राहू या ,जावू या, बोलू या, एवढे जरा बघा,  असे संजय मोने यांनी सांगितले.

विजय केंकरे यांनी, आपण एनसीपीएमध्ये नोकरी करीत असताना बॉस पु. ल. देशपांडे होते. त्यांनी एका पाटील नावाच्या गृहस्थाना 10 वाजता एक फाईल आणायला सांगितली होती, ते 11 वाजता घेऊन आले. भाईंनी त्यांना विचारले काय रे, उशीर का झाला? ते म्हणाले मी कामात व्यस्त होतो, म्हणून मला ती फाईल आणून देता आली नाही. तो गृहस्थ बाहेर पडताना भाई त्याला म्हणाले- अरे, पुढची फाईल मी तुला आणायला सांगितली आहे, ती तू सम प्रमाणात असशील तेव्हा घेऊन ये. त्यामूळे लक्षात ठेवा मराठी भाषेत माणूस कामात व्यग्र असतो व्यस्त नाही. व्यस्त हे गणिताचे प्रमाण आहे.  भाषा हा फार महत्वाचा भाग आहे म्हणून आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply