Breaking News

अखेर खोपोली पालिका प्रशासनाला आली जाग!

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा अडवून व्यवसाय करणार्‍या हातगाडीवाल्यांविरोधात खोपोली पालिकेने पोलीस बंदोबस्तात मोहीम उघडली तरी कायद्याचा धाक नसल्याने ही कारवाई ‘फुसका बार‘ ठरत आहे.

शहराच्या मुख्य बाजारपेठेत आर. डी. कॉम्प्लेक्ससमोर, त्याचप्रमाणे दीपक चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे फळ आणि भाज्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. काही ग्राहक हातगाडी शेजारीच गाडी उभी करून खरेदी करतात, त्यामुळे अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. रेल्वे स्टेशनला जाणारा हा मुख्य रस्ता तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी फेरीवाला मुक्त केला होता. पण या रस्त्यावर सायंकाळी पाचनंतर मोठ्या प्रमाणात हातगाड्या दिसून येतात. पूर्वीच्या मुख्याधिकार्‍यांनी यावर लक्ष ठेवण्यासाठी माणसांची नेमणूक केली होती, परंतु अधिकारी बदलले की, पहिले नियम गुंडाळे जातात हा खोपोलीकरांचा नेहमीचा अनुभव आहे. दिवसेंदिवस हातगाडीवाल्याची संख्या वाढतच आहे. पण यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही.

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या धर्तीवर हातगाडीवाल्यांना लायसेन्स देण्याविषयी पालिका वर्तुळात चर्चा झाली होती. मात्र त्यानंतर चर्चा झालीच नाही किंबहुना लोकप्रतिनिधींनीही त्यावर चर्चा घडवून आणलीच नाही. खोपोलीत सध्या अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी जोरदार आवाज उठविला पण पालिका प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील विकसित होणार्‍या डीपी रोड (लवजी, चिंचवली) भागात तर अनेक विकासकांनी मनमानी करित बांधकामे केली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचा भागच गिळंकृत केल्याचे खालापूर जर्नलिस्ट असोसिएशने निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले पण चौकशी सुरू आहे, बघतो या पलीकडे अधिकार्‍यांकडून दुसरे कुठलेच ठाम उत्तर मिळत नसल्याचा आरटीआय कार्यकर्ता तसेच पत्रकारांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत कर भरणारे नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply