Breaking News

सावित्री नदीत बुडी पद्धतीने रेती उत्खननासाठी राखीव क्षेत्राची मागणी

महाड : प्रतिनिधी

बुडी मारून रेती उपसा करण्यासाठी पुर्वीप्रमाणेच  सावित्री नदीत विचारेवाडी ते दासगाव आणि दासगाव ते सव या दरम्यान राखीव क्षेत्र ठेवले जावे, अशी मागणी पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून वाळू व्यावसायिकांनी केली आहे. महाड तालुक्यातील भोई व इतर समाजातील लोक गेल्या अनेक पिढ्या सावित्री नदीमध्ये डुबी पद्धतीने रेती उत्खनन करण्याचा पारंपारिक व्यवसाय करत आहेत. नदी प्रदूषणामुळे शेती आणि मासेमारी बंद झाल्याने सध्या स्थानिक ग्रामस्थ डुबी पद्धतीने वाळू उपसा करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. शासनाच्या गौण खनिज, महसूल व वन विभागाने 24 डिसेंबर 2004 रोजीच्या आदेशान्वये विचारेवाडी ते दासगाव क्षेत्रात हातपाटी पद्धतीने रेती उत्खनन करण्यासाठी परवाने देण्याचे आदेश दिले होते. मात्र अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी  2017-18 पासून हे परवाने बंद केले. तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने 2018-19 सालासाठी मंजूर केलेले सावित्री नदी बाणकोट खाडीमध्ये दाभोळ ते दासगाव (गट ए) आणि दासगाव ते सव (गट ब) या हातपाटी डुबी पारंपारिक पद्धतीने रेती उत्खनन गटांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी यांत्रिक पद्धतीने रेती उत्खननासाठी गट प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे डुबी पद्धतीने रेती उत्खनन करणार्‍या व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणार्‍या हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सावित्री नदी बाणकोट खाडीमध्ये विचारेवाडी ते दासगाव आणि दासगाव ते सव हे क्षेत्र पारंपारिक डुबी पद्धतीने वाळू उपसा करण्यासाठी कायमस्वरूपी परमिट पद्धतीने राखीव ठेवले जावे, अशी मागणी दासगाव येथील पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्थेच्या  माध्यमातून करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply