Breaking News

‘त्या’ खुनी आरोपींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पनवेेल : वार्ताहर

पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेत आहेत. हा मृतदेह नग्नावस्थेत आढळला असून डोक्यावर व चेहर्‍यावर मार बसल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले आहे. निश्चितच हा खून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसर पिंजून काढला. त्या ठिकाणी चालू असलेली विविध बांधकामे, झोपडपट्टी आदी ठिकाणी घराघरांत जाऊन पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, तसेच पनवेल शहर, तालुका, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, पेण आदी भागातील कोणी व्यक्ती हरविली आहे का? व त्याची नोंद आहे का? याचीसुद्धा तपासणी सुरू आहे. मृत व्यक्तीचे हाताचे ठसे घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. आधार कार्डमार्फतसुद्धा तपास सुरू असून, काही तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मृतदेहाच्या कवटीचा अभ्यास करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा मूळ चेहरा रेखांकित करून त्याआधारे माहिती मिळविण्याचादेखील प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप यश आले नाही. कोणत्याही परिस्थितीत या खुनाचा छडा लावायचाच यादृष्टीने पनवेल शहर पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी हे खून प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक दिसत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply