
कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. जागतिक युद्ध, दहशतवादी हल्ले यांचीही इतकी झळ विश्वाला कधी बसली नव्हती की नैसर्गिक आपत्तीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि एकूणच मानवी जीवनाची वाताहत झाल्याची इतिहासात नोंद नाही. ज्या चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली तो देश सुरुवातीला गडबडला आणि नंतर सावरलाही, पण कोरोनारूपी नवा महाविध्वंसक ‘ड्रॅगन’ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अवघे विश्व गिळंकृत करू पाहत आहे.सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोनाची. 2020हे वर्ष अशा पद्धतीने सुरू होईल असे कुणालाही स्वप्नातदेखील वाटले नसेल. सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी सारे जण सज्ज होत असताना चीनमध्ये महाभयंकर आपत्ती जन्म घेत होती. वुहानच्या सी फूड मार्केटमध्ये म्हणजे जिथे असंख्य पशू-पक्ष्यांचे मांस मिळते तेथील एका विक्रेत्या महिलेला गत डिसेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली. बघता बघता त्याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊन वुहान प्रांत मृत्यूच्या कवेत सापडला. हजारो लोकांचा बळी गेला. खरोखरच या विषाणूचे उगमस्थान मार्केट होते? की तेथील प्रयोगशाळेत तो तयार झाला? हे चीनलाच ठावूक. त्याचप्रमाणे तीन महिन्यांनंतर तेथील परिस्थिती आटोक्यात येऊन नवे रुग्ण अभावानेच आढळताहेत. त्यामुळे या विषाणूवरची लस वा औषध त्यांच्याकडे आहे किंवा ते काहीतरी लपवत आहेत. खरे काय, खोटे काय त्यांचे त्यांनाच माहीत, पण हा संसर्ग जगातील अनेक देशांमध्ये पसरून लोक अक्षरश: किड्या-मुंग्याप्रमाणे मरत आहेत, हे आताच्या घडीचे विदारक वास्तव आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिका, इटली, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, जर्मनी यांसारख्या विकसित देशांमध्ये प्रचंड प्रमाणात झाल्याचे दिसून येते. जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेत तर हाहाकार उडाला असून, दररोज शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्या तुलनेत आपल्या देशात अद्याप तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, परंतु रुग्ण आणि मृत्युमुखी पडणार्यांचा आकडा हळुहळू वाढतोय. त्यामुळे निर्धास्त राहाता येणार नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केली तसेच अन्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोना विषाणूची साखळी तोडणे हा त्यामागचा साधा, सरळ उद्देश. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कार्यरत आहेत, तर त्यांच्या अधिपत्याखाली आरोग्य, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आपले काम कर्तव्यनिष्ठेने बजावत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मात्र कोलमडली आहे. काही प्रमाणात नोकरवर्ग ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असला तरी कामाविना घरी असलेल्या अनेकांना यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा याची भ्रांत आहे, कारण जी काही पुंजी त्यांनी जमा केलेली होती ती एव्हाना संपत आली आहे. हाती काही नसल्याने मध्यमवर्गीय लोक धास्तावले आहेत. उद्योजक, धंदेवाईकांचेही व्यवहार ठप्प आहेत. रोजंदारीवर असणार्यांचे सर्वांत जास्त हाल होत आहेत. बाहेर पडता येत नाही आणि घरात बसून पोटाची आग शांत करता येत नाही अशा दुहेरी कात्रीत ते अडकले आहेत. एकूणच बहुतांश जणांना जगण्याची चिंता सतावत आहे. सुदैवाने मदतीचे असंख्य हात या अरिष्टात सरसावल्याचे पहावयास मिळाले. शासनाबरोबरच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आदी मंडळी गोरगरीब, गरजूंना आपापल्या परीने मदत करीत आहेत. कुणी जीवनावश्यक वस्तू पुरवतोय, कुणी अन्नदान करतोय, तर कुणी मास्क, सॅनिटायझर वाटप करतोय.राजकारणी कमी आणि समाजकारणी अधिक असलेल्या पनवेलच्या ठाकूर कुटुंबीयांचा दात्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच त्यांचे सुपुत्र भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर रात्रंदिवस गरीब, गरजूंसाठी तन-मन-धनाने झटत आहेत. लॉकडाऊनमुळे कुणाची उपासमार होऊ नये यासाठी त्यांनी पनवेल परिसरात अन्नछत्रे उघडली असून, त्याला नरेंद्र मोदी कम्युनिटी किचन असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून दररोज अनेकांची भूक भागविली जात आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमाने योगदान देत आहेत. दुसरीकडे आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर हे बंधू या संकटकाळात नागरिकांचे जगणे कसे सुरक्षित होईल, त्यांना दिलासा कसा मिळेल याकरिता विविध मुद्द्यांवर काम करीत आहेत. त्यासाठी प्रसंगी शासन-प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत.मंडळी, याआधीही अशी अनेक संकटे आलेली आहेत आणि त्या संकटांचा देशवासीयांनी एकजुटीने मुकाबला केल्याची नोंद आहे. कोरोनाविरुद्धची लढाई खडतर आहे, परंतु आपण ती नक्की जिंकू. त्यासाठी धीर आणि संयम जरुरी आहे. सध्याच्या अस्वस्थ परिस्थितीमुळे सर्वांचेच जगणे अवघड बनले आहे. ज्याला त्याला स्वत:सह कुटुंबाची काळजी असून, ती रास्तच आहे, मात्र अशा प्रकारे दीर्घकाळ हातावर हात ठेवून शांत बसणे कुणालाही परवडणारे नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हळुहळू सर्व व्यवहार चालू करावे लागणार आहेत. शासनाने तसे संकेत दिलेत. नव्हे तर काही प्रमाणात त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू केलेली आहे. एकंदर कोरोनारूपी संकटाचा सामना करूनच आगामी काळात जीवनमान पूर्वपदावर आणावे लागेल. तशी मानसिकता आता आपल्याला करायला हवी. अर्थात, अशा जीवनशैलीत विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही गोष्टींची दक्षता घेणे अनिवार्य आहे. ती घेऊन एक एक पाऊल सावधपणे पुढे टाकत मार्गक्रमण करणे सुरक्षित आणि सुज्ञपणाचेही ठरेल.
-समाधान पाटील (९००४१७५०६५)