खोपोली : प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी महड येथील श्री वरदविनायकाची पूजा बुधवारी (दि. 2) देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या हस्ते केल्यानंतर मंदिरातील माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा माघी गणेशोत्सव यंदाही कोरोनाविषयक सर्व नियम पाळून साजरा होत आहे. महड येथील श्री वरदविनायक मंदिरातील माघी गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे अनिवार्य आहे तसेच दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. उत्सवाच्या काळात श्री वरदविनायकाचे दर्शन गाभार्या बाहेरून घेता येईल. श्री गणेश जयंतीदिनी (दि. 4) सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी सुविधा असणार आहे. सभामंडपात बसण्याची मनाई असणार आहे. फक्त 50 स्थानिक ग्रामस्थांना भजनाचा कार्यक्रम करता येईल. सायंकाळी होणार्या पालखी सोहळ्यात 20 भाविकांना सहभागी होता येणार आहे. याकरिता भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, व्यवस्थापक बडगुजर यांनी केले आहे.