Breaking News

रायगडातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे गजबजले

अलिबाग ः प्रतिनिधी
नाताळच्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले असून, मुंबई-पुण्यातील पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे गजबजले आहेत.  पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
रायगड जिल्ह्यात विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी पोफळींच्या बागा, हिरवीगार वनराई, गडकिल्ले, लेण्या पाहायला मिळतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून काही तासांत रायगडात पोहचता येते. त्यामुळे पर्यटक रायगडला पसंती देताहेत. येथे अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन हे सुंदर समुद्रकिनारे तसेच रायगड, जंजिरा, कुलाबा हे किल्ले आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. ही सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.  गेल्या तीन दिवसांत अलिबागेत आठ ते 10  हजार पर्यटकांनी भेट दिली, तर मुरूड आणि नागाव परिसरातही जवळपास पाच ते सहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली.
दिवाळीपासून रायगडचा पर्यटन हंगाम सुरू होतो, परंतु यंदा लांबलेला पाऊस आणि वादळांच्या मालिकेमुळे दिवाळीनंतर पर्यटक इकडे फिरकले नव्हते, मात्र आता पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply