Breaking News

पुन्हा त्याच चुका नकोत

ओमायक्रॉनने महामारीचा शेवट होईल अशी आशा सारेच बाळगून असले तरी काही तज्ज्ञ हा शेवट इतका सहज-सोपा नसेल असा इशाराही देत आहेत. श्रीमंत देशांमध्ये बूस्टर डोस आणि चौथी लसही दिली गेली असली तरी काही गरीब देशांमध्ये जेमतेम दहा टक्के लोकांचेच लसीकरण पार पडले आहे. ही असमानताच महामारीचा शेवट अवघड करणारी ठरणार आहे. त्यामुळेच कोरोना महामारीविषयी बोलताना जबाबदारीच्या पदांवरील व्यक्तींनी गाफिलपणा वाढेल अशी विधाने करू नयेत.
गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या खाली घसरते आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत बर्‍यापैकी घसरण दिसते आहे. मुंबईतील कोरोना बळींची दैनंदिन संख्याही गुरुवारी सातवर आलेली दिसली. परिस्थितीत सुधारणा होते आहे हे निश्चितच दिलासादायक आहे. देशपातळीवरही मिझोरम आणि केरळ वगळता बहुतांश राज्यांमध्ये नव्या कोरोना केसेसची संख्या खाली जाताना दिसते आहे. परिस्थिती सुधारू लागल्याने ठिकठिकाणी निर्बंध उठवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. राजधानी नवी दिल्लीतही सोमवारपासून शाळा, जीम सुरू होणार असून सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने अलीकडेच निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. त्यानुसार उद्याने, सलून आदी सुरू झाली असून रेस्टॉरंट, चित्रपट-नाट्यगृहे, स्वीमिंगपूल, वॉटरपार्क आदींनाही 50 टक्के क्षमतेने उघडण्याची परवानगी आहे. परिस्थिती आटोक्यात आलेल्या शहरांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये शाळाही कमी वेळेकरिता सुरू झाल्या आहेत तसेच अनेक महाविद्यालयेही सुरू होण्याच्या तयारीत असून काही प्रमाणात ऑनलाइन-ऑफलाइन असे हायब्रिड वर्ग सुरू आहेत. परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे हे खरे, पण तेवढ्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात तिसरी लाट संपेल असे सांगून टाकले आहे. राज्यात 48 हजारांच्या घरात असलेली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता 15 हजारांवर आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे मार्चमध्ये ही लाट संपेल असे आपल्याला वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांशी चर्चा न करता, राष्ट्रीय-जागतिक परिस्थितीचा आढावा न घेता बेधडक भाष्य करण्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या शैलीला अनुसरूनच हे आहे. जगभरात काही देशांमध्ये परिस्थिती सुधारते आहे हे खरे असले आणि तिथेही आपल्यासारखेच निर्बंध उठवण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी अमेरिका, रशिया आदी देशांमध्ये कोरोना केसेसनी उच्चांकी आकडे गाठले आहेत. अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा तर कोरोना रुग्णांच्या अफाट संख्येमुळे सध्या प्रचंड ताण सोसते आहे. कॅनडासारख्या कथित श्रीमंत देशामध्ये बूस्टर डोस घेऊनही नागरिकांना कोरोनाची लागण होतेच आहे. अर्थात दुसरीकडे स्पेन, न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये निर्बंध उठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा नवा विषाणू उपप्रकार आढळून आला असला तरी मूळ ओमायक्रॉनपेक्षा त्याचे परिणाम फारसे वेगळे दिसलेले नाहीत. एकंदर जागतिक परिस्थिती पाहता कोरोना प्रतिबंधक दक्षतांमध्ये कुणीही ढिलाई आणता कामा नये असाच इशारा तज्ज्ञ देत आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या कथित शेवटानंतर आपण केलेल्या चुकांची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा नव्याने गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो हे ध्यानात ठेवलेले बरे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply