Monday , June 5 2023
Breaking News

गणेश जयंतीनिमित्त स्वच्छतेची जनजागृती

शून्य कचरा उपक्रम राबवून सामाजिक संदेश

पनवेल : प्रतिनिधी

‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये पनवेल महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या विविध सभा, समारंभ थ्री आर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तोंडरे गावातील दिनेश बाळाराम पाटील यांच्या कुटुंबियांनी माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेला कार्यक्रम ‘शून्य कचरा’ (झिरो वेस्ट इव्हेंट) संकल्पनेस अनुसरून साजरा केला.

या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीकचा जराही वापर करण्यात आला नाही. यामध्ये विशेषात्वाने भाविकांची भोजन व्यवस्था पर्यावरणाचे भान जपत केळीच्या पानावर करण्यात आलेली होती. पाणी आणि सरबत पिण्याकरीता कागदाच्या (इळे वशसीरवरलश्रश शर्पींळीेपाशपीं षीळशपवश्रू वीळपज्ञळपस र्लीि) व स्टीलच्या ग्लासचा वापर करण्यात आला. याशिवाय मंडपातील व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले होते तसेच कार्यक्रमाच्या सजावटीकरीता रंगीत कागदाचा, कापडाचा व बॅनर्सकरिता कार्डबोर्डचा वापर करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान जनजागृतीपर उत्कृष्ट रांगोळी काढण्यात आलेली होती. कार्यक्रम झाल्यानंतर उरलेले अन्न गरीबांना वाटप करण्याकरिता देण्यात आले तसेच उरलेला ओला कचरा कंपोस्ट करण्याकरीता कंपोस्ट पीटामध्ये टाकण्यात आला.

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत कार्यक्रम झाला. तेथे ओला व सुका कचरा टाकण्याकरिता स्वतंत्र कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यावर ‘माझा कचरा – माझी जबाबदारी’ असा संदेश तसेच वॉश बेसिनजवळ ’पाणी वाचवा’ असा संदेश दर्शनी भागी प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच येणार्‍या भाविकांकरीता सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था करण्यात आलेली होती.

या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी  जितेंद्र मढवी, स्वच्छ भारत वरिष्ठ सल्लागार  मधुप्रिया आवटे, स्वच्छता निरिक्षक  अजिंक्य दळवी,  पराग पाटील व इतर पालिका कर्मचारी उपस्थित होते.

पनवेल महापालिकेतर्फे आवाहन

स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांविषयी जागरूक राहून अगदी कौटुंबिक समारंभामध्येही स्वच्छता नियमांचे पालन करणार्‍या पाटील कुटुंबियांच्या स्वच्छताप्रेमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पाटील कुटुंबीयांनी पनवेलकरांसमोर स्वच्छतेविषयक नवीन आदर्श ठेवलेला आहे. नागरिकांनी अशा प्रकारे ’शून्य कचरा’ संकल्पनेतून आपले कार्यक्रम करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply