Breaking News

पेण अर्बन बँक बुडव्यांचे ठेवीदारांनी घातले श्राद्ध

पेण : प्रतिनिधी
अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा व सहकार क्षेत्रात कलंक लागलेल्या पेण अर्बन बँक घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेकडो ठेवीदारांनी शुक्रवारी (दि. 23) बँकबुडव्यांचे श्राद्ध घालत व मृत ठेवीदारांना श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध केला. पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या पेणमधील मुख्य कार्यालयासमोर या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नगराध्यक्ष प्रितम पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, सुप्रिया चव्हाण, प्रकाश पाटील, रवींद्र म्हात्रे तसेच विभावरी भावे, मनोहर पाटील, तुळसा पाटील आदींसह शेकडो ठेवीदार, खातेदार या वेळी उपस्थित होते. ‘ठेवी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘बँक बुडव्यांचा धिक्कार असो’, ‘बँक बुडव्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या वेळी बोलताना ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव म्हणाले की, आज संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेवीदारांना न्याय देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्याचे काम आम्ही करीत आहोत, पण या घोटाळ्यातील आरोपी मात्र राजरोसपणे फिरत आहेत. हे प्रशासनाचे अपयश असून प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आजही ठेवीदार आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत. या घोटाळ्यात ज्या जमिनी, मालमत्ता जप्त केली आहे  ती लवकरात लवकर विकून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. शेवटपर्यंत हा लढा सुरू राहील.
नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी हजारो ठेवीदारांना देशोधडीला लावणार्‍या घोटाळेबाजांचा निषेध व्यक्त करीत सांगितले की, आज ठेवीदारांची अवस्था बिकट असून कोणाला औषोधोपचारासाठी पैसे नाहीत, कोणाच्या मुलाचे शिक्षण थांबले, कोणाच्या मुलीचे लग्न मोडले, कोणाची मुले नैराश्यात गेली, तर काही ठेवीदार पैसे मिळतील या आशेवर असताना त्यांचा मृत्यू ओढावला. अशा विविध समस्या घेऊन ठेवीदार कसेबसे जगत आहेत. हे सर्व पाप ज्यांनी केले ते मात्र उजळ माथ्याने पेणमध्ये फिरत आहेत, परंतु त्यांना या पापाचा हिशोब याच जन्मी द्यावा लागेल.
‘माझ्याबरोबर माझ्या नातेवाईकांनी पेण अर्बन बँकेत आपली आयुष्याची कमाई मोठ्या विश्वासाने ठेवली. ही सर्व रक्कम बँक घोटाळ्यात गेली आहे. दरम्यान माझ्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्या पैशापासून वंचित आहोत, अशी प्रतिक्रिया ठेवीदार नंदनकुमार पाटील यांनी दिली.

आम्ही ठेवीदारांच्या पाठिशी -प्रितम पाटील
गेली 12 वर्षे आपले पैसे मिळतील या आशेने पेण अर्बन बँकेचे ठेवीदार हलाखीचे जीवन जगत एक एक दिवस पुढे ढकलत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही ठेवीदारांच्या पाठिशी आहोत. शासन स्तरावर प्रयत्न करीत असून गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल यासाठीही पाठपुरावा करीत आहोत, असे नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी सांगितले.

पेण अर्बन बँकेत माझे लाखो रुपये बुडाले. या घटनेमुळे माझा मुलगा नैराश्यात गेला असून नीट कामही करीत नाही. माझे वय झाले आहे व औषधोपचारसाठी पैसे नाहीत. मोठ्या काटकसरीने आमचा उदरनिर्वाह चालू आहे.
-विभावरी भावे, ठेवीदार

Check Also

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …

Leave a Reply