Breaking News

पाणी जाण्याचा मार्ग केला मोकळा

मुरूड नगर परिषदेची कारवाई; जुनी पेठमधील नागरिकांना दिलासा

मुरुड : प्रतिनिधी

शहरातील जुनी पेठ हा परिसर दाट वस्तीचा परिसर आहे. येथील नाला बंद केल्याने पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरत होते. मुरुड नगर परिषदेने  रितसर कारवाई करून नाल्यातील अडथळा दूर केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

जुनी पेठमधील जाहिद सादिक दळवी यांनी आपल्या घराजवळील नाला बंद केल्यामुळे पाणी तुंबून ते परिसरातील नागरिकांच्या घरात घुसत होते. त्याबाबत हिलाल सलाउद्दीन फराश व इतरांनी नगर परिषदेकडे रितसर तक्रार केली होती. त्याची दखल घेवून प्रभारी मुख्याधिकारी गोविंद कौटंबे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली व  जाहिद दळवी यांना नोटीस देऊन सदरचा नाला मोकळा करण्याचे आदेश दिले होते. तरीसुद्धा नाला मोकळा करण्यात आला नव्हता. नगर परिषदेचे कर्मचारी नाला मोकळा करण्यासाठी गेले असता दळवी यांनी त्यास विरोध केला होता. अखेर  नगर परिषदेने पोलीस संरक्षण घेऊन पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगरसेवक पांडुरंग आरेकर, विश्वास चव्हाण, रहिम कबले, प्रभारी मुख्याध्याकारी गोविंद कौटंबे, नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी राकेश पाटील, पोलीस निरीक्षक  परशुराम कांबळे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी व पोलीस या वेळी उपस्थित होते.

पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग  कोणीही बंद करू नयेत. तसे करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. घर बांधण्यासाठी रेती अथवा खडी टाकून गटारे बुजविले आहेत, त्यांनी त्वरित आपले बांधकाम साहित्य उचलून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा ते साहित्य जप्त करण्यात येईल.

-गोविंद कौटंबे, प्रभारी मुख्याध्याकारी, मुरूड नगर परिषद

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply