Wednesday , June 7 2023
Breaking News

पेणमधील सोनखार रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर

पेण : प्रतिनिधी

आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून आत्तापर्यंत पाच कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून विकासकामांचा हा झंझावात यापुढेदेखील सुरू राहणार आहे, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी शनिवारी (दि. 5) दिली.

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीतून दादरफाटा ते सोनखार या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या कामाचे उद्घाटन वैकुंठ पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शहराप्रमाणेच ग्रामीण भागदेखील सुजलाम सुफलाम करण्याचे आमदार रविशेठ पाटील यांचे स्वप्न असून हे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

पेण तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार रविशेठ पाटील यांनी विकासकामांचा धुमधडका सुरू ठेवला असून, त्यांनी गेली अनेक वर्षे प्रलंबित असणार्‍या सोनखार रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीतून तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असल्याचे वैकुंठ पाटील यांनी या वेळी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ म्हात्रे, रेश्मा म्हात्रे, परमेश पाटील, मिलिंद म्हात्रे, सुर्यहास पाटील यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. पेण तालुक्यातील दादरफाटा ते सोनखार या रस्त्याचे बर्‍याच वर्षानंतर काम झाल्याने परिसरातील ग्रामस्थ सुखावले आहेत.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply