टेबल टेनिस खेळाच्या रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने जागतिक टेबल टेनिस खेळाच्या 19 वर्षीय मुलींच्या गटात रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील पहिली टेबल टेनिस खेळाडू आहे.
2012मध्ये औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 12 वर्षांखाालील मुलींच्या गटात तिने रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनला पहिले रौप्यपदक मिळवून दिले, तसेच एकेरीतही स्वतःला रौप्यपदक प्राप्त केले होते. 2013मध्ये धुळे येथील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 12 वर्षांखालील मुलींच्या गटातही सुवर्णपदक पटकावले. 2013मध्ये अजमेर राजस्थान येथील राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात कॅप्टन म्हणून तिची निवड करण्यात आली. यात तिने रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनला पहिले व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनला अजमेर राजस्थान येथील राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. 2015मध्ये स्वस्तिकाने 14 व 17 वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले होते.
भारतातील तिची रँक एक नंबर असून जागतिक टेबल टेनिस खेळाच्या रँकिंगमध्ये तिने चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. स्वस्तिका घोष ही रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून, तिने आपले लक्ष आता ऑलिम्पिकसाठी केंद्रित केले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेळोवेळी सहकार्य आणि प्रोत्साहन स्वस्तिकाला मिळत असते.