मुरूड : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालय आणि उरण नागरी संरक्षण दल उपनियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड पंचायत समिती सभागृहात 17 व 18 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यांतील जीवरक्षक, नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या शिबिरात सहभागी झाले होते.
संकट काळातील परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. स्थानिक लोक प्रशिक्षित व्हावेत तसेच आपत्तीच्या काळात प्राणहानी व वित्तहानी टळावी यासाठी या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी प्रास्ताविकात केले.
आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्वयंसेवकांनी अपघातग्रस्त व संकटात सापडलेल्या मानवी जीवांना सहाय्य करण्यासाठी धैर्याने पुढे आले पाहिजे, असे सांगून नागरी संरक्षण दलाचे उरण येथील सहाय्यक उपनियंत्रक काशिनाथ मुरकटे यांनी नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तींची विस्तृत माहिती दिली.
काशिनाथ मुरकटे यांनी या शिबिरात प्रशिक्षणार्थींकडून अनेक प्रात्यक्षिकेही करून घेतली.