52 हजाराचा मुद्देमाल केला नष्ट; नागोठणे पोलिसांची कामगिरी
नागोठणे : प्रतिनिधी
चेराटी, काळकाई जंगल परिसरातील गावठी दारू तयार करण्याच्या चार हातभट्ट्या नागोठणे पोलिसांनी बुधवारी (दि. 23) उद्ध्वस्त केल्या. यावेळी सुमारे 52 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
चेराटी, काळकाई भागातील जंगलात गावठी दारू अवैध रित्या तयार करण्यात येत असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवार पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितिन गायकवाड, गंगाराम धूमणे, प्रतीक्षा गायकवाड, शिपाई आशिष पाटील, रामनाथ ठाकूर, सत्यवान पिंगळे, नम्रता आयर यांच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून चार गावठी दारूच्या बेवारस हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. 14 प्लास्टिक ड्रम, चार लोखंडी टाक्यांसह गुळमिश्रित रसायन असे एकूण 52 हजार रुपये किंमतीचा माल मिळून आला. तो पेटवून जागीच नष्ट करण्यात आला.