मुरूड ः प्रतिनिधी
यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व शांततेत साजरा करून शांतता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांना विशेष सहकार्य करून गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मदत करावी, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूड पोलीस ठाण्यात शांतता सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अतिक खतीब, मंगेश दांडेकर, आदेश दांडेकर, वासंती उमरोटकर, श्रीकांत सुर्वे, कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले, मनोहर मकू, महेश मानकर, अभिजित पानवलकर, मुरूड नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार आदी उपस्थित होते.
या वेळी सहाय्य्क पोलीस निरीक्षकांनी शासनाकडून आलेल्या सूचना उपस्थितांना सांगितल्या. मुरूड नगरपरिषदेने गणपती विसर्जन कालावधीत विसर्जनाच्या जेट्ट्यांवर पुरेशी प्रकाश योजना करावी. विसर्जनासाठी जीवरक्षकांची मोठी संख्या तैनात करावी, जेणेकरून सहज विसर्जन करता येईल. विसर्जनावेळी लहान मुलांना समुद्रावर नेऊ नये. गणरायाच्या आगमन व विसर्जनावेळी वाद्य वाजवू नयेत, तसेच गणरायाचे विसर्जन करताना घरात आरती केल्यावर विसर्जनाच्या वेळी आरती करू नये. त्यामुळे समुद्रावर जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही. याबाबत लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रंगराव पवार यांनी केले आहे.