Breaking News

चोळेगांधे प्राथमिक शाळेला गळती

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; पालकांतून संताप

पाली : प्रतिनिधी  – रायगड जिल्हा परिषदेच्या चोळेगांधे येथील प्राथमिक शाळेला गळती लागली आहे. शाळेचे छप्पर उडाल्याने वर्गखोल्यातून आसमंताचे दर्शन होत आहे, तर पावसाळ्यात वर्गखोल्यांत गळती लागल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरविले जातात. या शाळेत चोळेगांधेसह आसपासच्या आदिवासींपाड्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळेची इमारत जुनी झाली असून कुजलेले वासे; फुटलेले छप्पर अशी दयनीय अवस्था झाली आहे. अतिवृष्टीत शाळेची पडझड होवून विद्यार्थी व शिक्षकांच्या शिरावर मृत्यूची टांगती तलवार असल्याचे दिसते. अशा धोकादायक शाळेतून मुले घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. अशा असुरक्षित व धोकादायक शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असून कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. छप्पर गळत असल्याने वर्गखोल्यांत पाणी साचत आहे. विद्यार्थ्यांना बसवावे कुठे, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. या गंभीर समस्येची शाळा व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी व शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व जलद सुधारणा करण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, पंचायत समिती सदस्य नरेश गावंड, शिक्षणाधिकारी श्री. भारमल, केंद्रप्रमुख रवींद्र पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा म्हात्रे आदींनी या शाळेच्या धोकादायक इमारतीची पाहणी केली. या वेळी शिवसेना शाखाप्रमुख दीपक पाटील, उपशाखा प्रमुख प्रकाश म्हात्रे, नितीन पाटील, खंडू म्हात्रे, हिराचंद्र म्हात्रे, प्रफुल्ल पाटील उपस्थित होते. शाळेची गळती थांबविण्यासाठी जलद उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply