आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे, असे लेखी उत्तर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमार्फत सोडण्यात येणार्या विषारी वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे जानेवारी 2022मध्ये निदर्शनास आले असून या औद्योगिक वसाहतीतील 940 कारखान्यांपैकी निम्म्याहून अधिक कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी व विषारी वायूमुळे प्रदूषण होत असल्याने येथील नागरिकांना दमा, क्षयरोग, छातीत दुखणे तसेच डोळ्यांचे विकार होत असून मुलांच्या शारीरीक वाढीवर परिणाम होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कारखानदार रात्री-अपरात्री विषारी वायू सोडत आहेत. या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणार्या व प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्या कारखान्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, पनवेल महानगरपालिकेच्या 23 फेब्रुवारी 2022च्या पत्रान्वये वायू प्रदूषणामुळे श्वसन दाह तसेच दम्याचे आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेले नाहीत. राष्ट्रीय हरित लवाद येथे दाखल झालेली याचिका (क्र. 125/2018) ही प्रामुख्याने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदान केलेल्या संमती पत्रामधील मानकांचे पालन करत नसल्याबद्दल आहे व सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. या याचिकेमध्ये हवा-वायू प्रदूषणाबाबत बाबीचा समावेश नाही. तथापि, वायू प्रदुषणाच्या तक्रारीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रात्रीची गस्त घातली जाते व तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योग मंडळाने प्रदान केलेल्या संमतीपत्रामधील हवा व जल प्रदूषण नियंत्रणविषयक अटी व शर्तीचे पालन करतात किंवा कसे यांची शहानिशा केली जाते. मंडळाकडून तळोजा औद्यगिक क्षेत्रामध्ये रात्रीची पाहणी करण्यात येते व दोषी कारखान्यावर नियमित कारवाई करण्यात येत असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये मागील एक वर्षामध्ये सहा उद्योग बंदचे आदेश, एक प्रस्तावित निर्देश आणि सहा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.