Breaking News

पनवेल महापालिका होणार हायटेक!

आरोग्य, साफसफाईसह विविध विषयांना महासभेची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या शुक्रवारी (दि. 4) झालेल्या महासभेत नागरिकांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे करण्यात आलेल्या बेकायदेशीर भरावामुळे पनवेलमध्ये पूरनियंत्रण रेषा बदलून पाणी शहरात येते. तसे होऊ नये यासाठी गाढी नदीचे पूररेषा सर्वेक्षण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर मलनि:स्सारण वाहिन्यांच्या दैनंदिन साफसफाईसाठी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याच्या विषयास महासभेने मंजुरी दिल्याने पनवेल महापालिका आता हायटेक होणार आहे.
पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी ऑनलाइन घेण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या महासभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगर सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
पनवेल महापालिका हद्दीत 230 किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या आहेत. या मलनि:स्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक जेटिंग गारबींग अ‍ॅण्ड रोडींग मशीन असलेली सहा वाहने आणि सिव्हर सेक्शन कम जेटिंग मशीन विथ रिसायकलिंगची (10,500 लिटर क्षमता असलेली) दोन वाहने खरेदी करण्याच्या विषयास महासभेने मंजुरी दिली तसेच या वाहनांचे परिचालन व देखभाल करण्याकामी पाच वर्षांकरिता मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या विषयासही महासभेने मंजुरी दिली.
पनवेल महापालिका हद्दीत सिडकोच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी बेकायदेशीर भराव करण्यात आले आहेत. त्यामुळे  पूर्वाश्रमीच्या पनवेल नगर परिषदेची पूररेषा बदलून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होते.
या पार्श्वभूमीवर पूररेषा सर्वेक्षण करणे आवश्यक होते. यासाठी संपूर्ण नदीचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याने महापालिका हद्दीतून जाणारी गाढी नदी व हद्दीलगतच्या उर्वरित भागाचे सर्वेक्षण करण्याला महासभेत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या मालकीचे प्रभाग समिती ‘ब’मधील श्री काळभैरव मंगल कार्यालय हे कळंबोली गावातील ग्रामस्थांकरिता श्री समर्थ महिला मंडळाला, कोपरा येथील सभागृह हनुमान ग्रामविकास मंडळाला व धरणा गावातील व्यायामशाळा  नाममात्र दराने शासन मान्यतेने उपलब्ध करून देण्यास महासभेने मंजुरी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रस्तावित रुपरेषेनुसार कार्यक्रम साजरा करण्यासाठी येणार्‍या खर्चास व महापालिका मालकीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे व्यवस्थापन तीन वर्षांकरिता करण्याच्या निविदा प्रक्रियेस व खर्चास महासभेने मंजुरी दिली.

कॅन्सरग्रस्तांना उपचारासाठी आर्थिक मदत
पनवेल महापालिका हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिला, मुले व मुली यांना उपचारासाठी 25 हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय महासभेत घेण्यात आला. 1 एप्रिल 2021नंतर कॅन्सरचे निदान झालेल्या व मुलाचे वय 0 ते 18 वर्षापर्यंत असल्यास त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कामोठ्यामध्ये 28 किमी व कळंबोलीमध्ये 29 किमी मलनि:स्सारण वाहिनी आहे. त्यात निम्मी पाइपलाइन 250 एमएमची, तर निम्मी 450 ते 1000 एमएम आहे. या परिसराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने ती पाइपलाइन लहान पडते. त्यामुळे नेहमी तुंबून त्याचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 250 एमएमची लाइन बदलण्याबाबत सिडकोकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले. पनवेल महापालिकेने ती बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
-डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply