आरोग्याच्या समस्या वाढल्या; पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा इशारा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्यनारायण आग ओकत असल्याने अनेक जण बाहेर पडणे टाळतना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मात्र अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुन्हा सोमवारपासून (दि. 28) उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढलेल्या उष्णतेमुळे अनेकांना अॅसिडीटी, अपचन, चक्कर येणे, अन्नावरची वासना जाणे अशा प्रकारच्या व्याधींनी जडले आहे. त्यामुळे सध्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाल्याने सर्व नियम शिथिल करून ऑफिस, शाळा व महाविद्यालये नियमित सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक नोकरदारांसह विद्यार्थ्यांना कडक उन्हात बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्याधी जडण्याचे जास्त प्रमाण हे विद्यार्थी व 25 ते 45 या वयोगटातील नोकरदार वर्गामध्ये असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उष्म्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी शीतपेयांऐवजी काकडी, कलिंगड, केळे अशा फळांचे सेवन करावे. त्याचप्रमाणे लिंबू सरबत, कोकम सरबत यांसारखी पेये पिण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत. पुणे वेधशाळेने सोमवारपासून पुन्हा उष्णतेची लाट येण्याबाबत अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान सुमारे 42 ते 45 सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसी, कुलरच्या मागणीत वाढ :
वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी एसी, कुलर यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वस्तूंचा बाजार तेजीत आल्याचे पाहायला मिळत आहे.
कपडे बाजारही तेजीत :
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक जण फिकट रंगाचे आणि सुती कापडे वापरण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे कपड्यांच्या दुकांनामध्येही काहीशी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये खरेदीसाठी महिलांची संख्या लक्षणीय आहे. यासोबतच स्कार्फ, सनकोट, हॅण्डग्लोज यांचीही मागणी वाढली असल्याचे दुकानदारांनी सांगितले.