बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साहात
कर्जत : बातमीदार
कार्यकर्ते ही भाजपची ताकद असून, कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. या मतदारसंघात परिवर्तन अटळ असून, येथील पुढील आमदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बुधवारी (दि. 25) कर्जतमध्ये व्यक्त केला. कर्जत विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वतीने बुधवारी येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात पक्षाच्या बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात साटम बोलत होते. भाजपचा आमदार झालाच पाहिजे यासाठी कार्यर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे, असे साटम यांनी या वेळी सांगितले. निवडणुकीच्या वेळी अन्य पक्षातील उमेदवारांना मतदान केंद्रामध्ये बसायला कार्यकर्ते शोधावे लागतात, मात्र भाजपकडे मतदारसंघातील सर्व 326 बूथवर काम करणारे कार्यकर्ते असून त्यांना शक्ती केंद्र प्रमुखांची ताकद मिळत आहे. भाजपच्या कर्जत मतदारसंघातील शक्तीचा अंदाज विरोधकांना लवकरच येईल, असे साटम या वेळी म्हणाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी प्रास्ताविक केले. कर्जत मतदारसंघात आपल्या पक्षासाठी पोषक वातावरण असून, या मतदारसंघात आपला आमदार निवडून येईल, एवढी ताकद निर्माण झाली असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांनी सांगितले. जि.प.चे माजी सभापती पुंडलिक पाटील यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. या वेळी बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख यांची कामे असतील याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक काळात बूथ प्रमुखांनी कसे काम करावे, याबाबत सुशील शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप ओबीसी मोर्चाचे संतोष भोईर यांनी केले. भाजपचे मतदारसंघ विस्तारक अविनाश कोळी, मतदारसंघ संपर्क अध्यक्ष विनोद साबळे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, शरद कदम, कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुनंदा भोसले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर आदींसह भाजपचे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.