सर्व पक्षांना दूर सारून मिळविली एकहाती सत्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. 10) लागले. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपला करिष्मा कायम ठेवलाय. निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या युपीत भाजपने पुन्हा विजय मिळवला आहे. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमत मिळविले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालात चार राज्यांत भाजपला बहुमत मिळाले. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे भाजपला मिळालेल्या यशानंतर दिल्लीत भाजपच्या मुख्यालयातून पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. या वेळी गृहमंत्री अमित शाह, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले की, मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांची पूर्णपणे प्रशंसा करेल, ज्यांनी दिवस-रात्र न पाहता या निवडणुकीत कठोर परिश्रम केले. आपले कार्यकर्ते जनतेच मन, त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले. याचबरोबर संपूर्ण पक्षाचे नेतृत्व ज्यांनी केले, कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचेदेखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
पनवेल : पाचपैकी चार राज्यांत भाजपने बहुमत मिळविले. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देदिप्यमान कामगिरी करत बहुमत प्राप्त केले. त्याबद्दल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलले
सर्वांत मोठी लढाई उत्तर प्रदेशची होती. जी भाजपने जिंकलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 272 जागी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 126 जागांवर समाधान मानावे लागलेय. तिकडे बसपा तिसर्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहचले. भाजपने 272 जागांवर आघाडी मिळवत विरोधकांना आस्मान दाखवलं आहे. 2017 नंतर पुन्हा 2022 मध्ये सलग दुसर्यांदा निर्विवाद बहुमत मिळवणार्या भाजपचा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
गोव्यात सलग दुसर्यांदा भाजपकडे सत्ता
गोव्यात भाजप सलग दुसर्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालेय. गोव्यात भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय, कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिलेय. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरू केलीय. त्यामुळे आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज उत्साहाचा, उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. आज निवडणुकीचे निकाल पाहताना माझे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद आहे. सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा. भाजपच्या या बंपर विजयात तुम्हा सर्वांचा हातभार आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे – खा. शरद पवार
मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी काँग्रेस पक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडले आहे. काँग्रेस पक्षाचा 1977 साली यापेक्षा वाईट पद्धतीने पराभव झाला होता. काँग्रसेच्या नेतृत्त्वाने आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांनी आपण कुठे कमी पडलो, कुठे एकत्र येण्याची गरज होती आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे होते, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली तर जनता तुम्हाला पुन्हा स्वीकारेल, असे, मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार पवार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मणिपूरमध्ये भाजपला बहुमत
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुतेक निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले आहेत. तर काँग्रेस नऊ, एनपीपी नऊ आणि इतर आठ जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपची सर्व पक्षांना धोबीपछाड
उत्तराखंडमध्ये भाजपने एकूण 70 जागांपैकी सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वांत मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 18 जागा मिळाल्या आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष चार जागांवर आघाडीवर आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ; आप विजयी
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्ष विजयी झाला आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा सुपडा साप केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आप आले आहे.
सकारात्मक मतांवर भाजप निवडून आलेली आहे. मला विश्वास आहे गोव्यात एक चांगले सरकार आम्ही स्थापन करू. मी पहिल्या दिवशीच हे सांगितले होते की, शिवसेनेची लढाई ही आमच्याशी नाहीए ती लढाई नोटाशी आहे. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती होती, या दोघांची एकत्रित मते जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते