पनवेल ः प्रतिनिधी
महापालिका हद्दीतील खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये शिवसेना शाखेच्या बाजूला दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन अनधिकृत मंदिर बांधल्याची तक्रार नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केली आहे.
खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये रेल्वे लाईनलगत शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूला शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ताडपत्री लावून मंदिर उभारण्यात आले. याबाबत माहिती मिळताच, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी त्याठिकाणी जाऊन खात्री केली. त्यानंतर महापालिका प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गावडे, महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार केली.
एकनाथ गायकवाड यांनी आपल्या पत्रात शहरात अशी अनेक अनधिकृत बांधकामे असून अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ही अनधिकृत बांधकामे होत आहेत. यापुढे ती होऊ नयेत, यासाठी अशा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.