मोहोपाडा ः प्रतिनिधी
रिक्षाचालक आदम शेख यांनी चांभार्ली येथील कौतुभ जगताप यांची रस्त्यात पडलेली पैशाने भरलेली बॅग त्यांना परत केली. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कौतुभ जगताप यांचा दूध व्यवसाय असून ते चांभार्लीहून आपल्या स्कुटीवरून बँकेत पैसै भरणा करण्यासाठी रस्त्याने जात असताना त्यांच्या नकळत स्कुटीवरून बॅग खाली पडली. पुढे ते यावेळी सेबी वळणावर एचडिएफसी बँकेसमोर आल्यानंतर आपली 51 हजार रुपये रोख असलेली बॅग हरविल्याचे जगताप यांच्या लक्षात आले. याचवेळी रस्त्यात पडलेल्या या बॅगेकडे रिक्षाचालक आदम शेख यांचे लक्ष गेले. त्यांनी तातडीने रिक्षा बाजूला घेऊन पाहिले असता त्या बॅगेत 51 हजार रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या वेळी रिक्षाचालक आदम शेख यांनी तातडीने पैशांची बॅग घेऊन टाकेदेवी रिक्षाचालक संघटनेचे उपाध्यक्ष फुलचंद लोंढे यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. बॅगेत रोख रक्कम व बँकेची स्लिप होती. त्यांनी बॅगेला काही न करता तसेच ठेवून रिक्षा चालक-मालक संघटनेचे वरिष्ठांना त्यांनी कळवले आणि सर्व ग्रुपवर त्यांनी याची माहिती पाठवली. टाकेदेवी रिक्षा चालक- मालक संघटनेचे स्टँड प्रमुख किरण पवार यांच्या प्रयत्नाने ज्या व्यक्तीची पैशाची बॅग हरवली होती, त्यांचापर्यंत पोहचवण्याचे काम किरण पवार यांनी केले. कौस्तुभ जगताप यांनी आदम शेख व टाकेदेवी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सर्व रिक्षाचालकांना धन्यवाद दिले. रिक्षाचालक आदम शेख यांनी आपला प्रामाणिकपणा दाखविल्याने टाकेदेवी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष संदीप मुंढे यांनी रिक्षाचालक आदम शेख यांचे शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन आभार मानले.