Breaking News

चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसवा

रसायनी : प्रतिनिधी

दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लीचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या  उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशूविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रिआ स्कूल आदी असल्याने चांभार्ली उताराचा रस्ता ओलांडत असताना जीव मुठीत घेऊन नागरिक रस्ता ओलांडत आहेत.

या अगोदर रस्त्यावरून भरधाव जाणार्‍या वाहनांना लगाम बसावा म्हणून उताराजवळील आगरी कट्ट्यासमोर, सेबी वळणाजवळ गतिरोधक बसविण्यात आले होते, परंतु एनआयएसएम सेबी प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने या रस्त्यावरील गतिरोधक काढण्यात आले. गतिरोधक काढून तीन वर्ष होऊनही या उताराच्या रस्त्याला गतिरोधकच नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. कालणवाडी, शिवनगर, तळेगाव, पानशिल आदी गावांतील विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडून शिक्षणासाठी जावे लागते. अशावेळी अनर्थ घडल्यास जिम्मेदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत. यासाठी चांभार्ली-मोहोपाडा रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

चांभार्ली रस्त्याच्या उतारापासून सेबी वळणापर्यंत वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकच नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात.त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply