Breaking News

मुरूडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

मुरूड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अचानकपणे आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप दांडेकर यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री, खासदार व आमदार असतानासुद्धा शासकीय कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची दडपशाही केली जाते. प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेना मात्र याबाबतीत प्रबळ झाला असून त्यांची शासकीय यंत्रणेवरची पकड वाढली असल्याचे जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात मंगेश दांडेकर यांनी नमूद केले आहे.
जे पक्षाला बाधा निर्माण करतात, पक्षाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात त्यांचीच कामे खासदार, पालकमंत्री व आमदार करतात. तालुका अध्यक्षाला डावलून विरोधकांनी मागणी केलेली कामे मंजूर होणे हे एक प्रकारे तालुकाध्यक्षपदाच्या शिष्टाचारविरुद्ध असून पक्षाला बाधक आहे, अशी नाराजीसुद्धा दांडेकर यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत आपला सहयोगी पार्टनर बदलून भूमिका बदलत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुरूड तालुक्यात शिवसेनेशी विचार जुळत नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेसोबत युती नको, असे दांडेकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी (दि. 10) मुंबई येथे तालुका अध्यक्ष दांडेकर यांच्यासह काही प्रमुख पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे समजते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply