Breaking News

राजिपच्या 14 शाळांच्या दुरुस्तीला पनवेल महापालिकेची परवानगी

भाजपच्या पाठपुराव्याला अखेर यश

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या महापालिकेकडे हस्तांतरीत न केलेल्या 14 शाळांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती आवश्यक असल्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या शाळांना दुरुस्तीसाठी मागितलेली आवश्यक परवानगी महापालिकेने दिली आहे.
पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 मध्ये स्थापन झाली त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिकेबरोबरच त्यामध्ये ग्रामीण भागाचाही  समावेश  करण्यात आला. या ग्रामीण भागातील 52  रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाल्या. या शाळा जिल्हा परिषदेने महापालिकेकडे हस्तांतरीत केलेल्या नाहीत. त्या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने महापालिकेने त्याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे या शाळा हस्तांतर करण्याची मागणी केली, पण जिल्हा परिषदेने अद्याप त्या शाळांचे हस्तांतर केलेले नाही.
पावसाळा सुरू होत असल्याने शाळांची दुरूस्ती करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांचेकडे करीत होते. याबाबत पनवेल पंचायत समितीकडे संपर्क साधला असता, पनवेल पंचायत समितीने या शाळा महापालिका हद्दीत येत असल्या तरी त्या शाळांच्या इमारती  जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असल्याने यातील 14 शाळांची  दुरूस्ती जिल्हा नियोजन मंडळ व एसडीआर फंडातून करण्यासाठी निधी मंजूर करून दुरुस्तीसाठी महापालिकेकडे ना हरकत मागितली असल्याचे सांगितले. त्याला पनवेल महापालिकेच्या शिक्षण व बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.
दुरुस्तीसाठी परवानगी मागितलेल्या शाळा
1. वळवली 2. खुटरी 3. कळंबोली 4. पडघे 5. तळोजे पाचनंद  म. 6. पालेखुर्द 7. खिडुक पाडा 8. ओवे कॅम्प  9. ओवेपेठ म. 10. टेंभोडे  11. ओवे खुर्द 12. तळोजे मजकूर 13. पापडीचापाडा 14. करवले

पनवेल महापालिका स्थापन झाल्यावर आम्ही जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाच वर्षे या 52 शाळा हस्तांतर करण्याची मागणी करीत आहोत, पण जिल्हा परिषदेने त्या शाळा हस्तांतरीत केल्या नाहीत. पावसाळ्याच्या आधी तरी या शाळांची दुरूस्ती तरी करा, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करीत होते. त्यामुळे मी पंचायत समितीकडे संपर्क साधला असता त्यांनी 14 शाळांची  दुरूस्ती जिल्हा नियोजन मंडळ व एसडीआर फंडातून करण्यासाठी निधि मंजूर केला असून त्यासाठी महापालिकेकडे ना हरकत मागितली आहे ती मिळाली नसल्याचे सांगितले. मी महापालिकेच्या संबंधित विभागात विचारले असता, परवानगीचे पत्र नुकतेच दिले असल्याचे समजले. पाऊस सुरू होत असल्याने मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी पंचायत समितीला लवकरात लवकर काम करण्यास सांगितले आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महापालिका

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply