कर्जत : बातमीदार
भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी 7 एप्रिल रोजी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याचा कर्जत भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.
तुम्ही केवळ शिवसेनेचे नाही, तर भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून निवडून आलेले आमदार आहेत हे लक्षात ठेवा आणि कर्जतची शांतता बिघडवू नका, असा इशारा या वेळी भाजपच्या पदाधिकार्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिला तसेच चुकीच्या वक्तव्याबद्दल भाजपची माफी मागावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
नेरळ येथे आयोजित भाजपच्या पत्रकार परिषदेस तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, उपाध्यक्ष वसंत भोईर, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, ऋषिकेश जोशी, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, तसेच मंदार मेहेंदळे, प्रमोद पाटील, विनायक पवार आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही या केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे म्हणाले की, आम्ही राज्य सरकारविरुद्ध अनेक आंदोलने मागील दोन वर्षे करीत आहोत, पण आम्ही कधीही महायुतीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भूमिका घेतली नाही. नेरळमध्ये आमच्यामुळे शिवसेनेचा सरपंच आहे, तर येथील खासदार, आमदार आणि कर्जतचा नगराध्यक्षदेखील आमच्यामुळे शिवसेनेचा झालेला आहे हे ते आता विसरले असले तरी विसरण्याची आमची संस्कृती नाही. तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण शिवसेनेच्या आमदारांनी गढूळ करू नये, असेही त्यांनी सुनावले.
किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी, आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी कर्जतच्या आमदारांची जीभ घसरली, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही असे म्हणणे म्हणजे मोगलाई आली आहे काय, असा सवाल उपस्थित केला. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याची वाट शिवसैनिक अडविणार नाहीत आणि जर अडवली तर तालुक्यातील राजकारण बदललेले असेल, असे सांगून भाजपचा कार्यकर्ता स्वाभिमानी असल्याने कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरणारा नाही, असे गोगटे म्हणाले.
भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनी, तुम्ही युतीचे आमदार आहेत हे लक्षात ठेवावे. आम्ही जेव्हापासून भाजपमध्ये काम करतोय तेव्हा तुम्ही शिवसैनिकदेखील नव्हता, अशी टीका केली. तुम्ही आज आमदार आहात, पण भाजप आहे म्हणून तुम्ही आमदार झालात हा इतिहास ध्यानात ठेवा, असेही त्यांनी म्हंटले.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांनी, आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि भाजप कार्यकर्त्यांची माफी मागावी, अशी भूमिका मांडली. तुमच्या वक्तव्याने कटूता आली असून तुमची ही मुक्ताफळे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी निडर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Check Also
सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …